हॉटेलमध्ये जेवणासाठी गेल्यानंतर मेनू कार्ड, पदार्थांची चव पाहून चालणार नाही; हायजेनिक रेटिंग पाहिले का?

Gramin Varta
153 Views

रत्नागिरी : जिल्ह्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि केटरिंग आस्थापनांसाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) नवीन व कडक नियमावली लागू केली आहे. या नव्या नियमांनुसार ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या अन्नाचा दर्जा, स्वच्छता आणि आरोग्याची हमी मिळण्यासाठी अनेक गोष्टी बंधनकारक करण्यात आल्या आहेत. आता हॉटेलमध्ये जेवणासाठी गेल्यानंतर केवळ मेनू कार्ड आणि पदार्थांची चव पाहून चालणार नाही, तर हॉटेलच्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये ग्राहकांना सहज दिसेल असा ‘हायजेनिक रेटिंग इमोजी बोर्ड’ लावला आहे का, हे पाहणे प्रत्येक नागरिकासाठी गरजेचे ठरत आहे.

अन्नसुरक्षेच्या दृष्टीने एफडीएने नियमावली अधिक कडक केली असून, किचनपासून ते कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासणीपर्यंत सर्व बाबींवर काटेकोर लक्ष ठेवले जात आहे. हॉटेलमधील किचन व वाढपी कर्मचाऱ्यांची दर सहा महिन्यांनी आरोग्य तपासणी करणे अनिवार्य असून, संबंधित कर्मचाऱ्याला त्वचारोग किंवा संसर्गजन्य आजार असल्यास त्याला कामावर ठेवता येणार नाही. तसेच डोक्यावर कॅप किंवा हेअरनेट, हातामध्ये ग्लोज्, अप्रॅन आणि कापलेली नखे असणे बंधनकारक करण्यात आले असून, वैयक्तिक स्वच्छतेचे पालन करणे कर्मचाऱ्यांना सक्तीचे केले आहे.

परवाना पत्रक ग्राहकांना सहज दिसेल अशा ठिकाणी लावणे, दर सहा महिन्यांनी हॉटेल व किचनचे पेस्ट कंट्रोल करणे अनिवार्य करण्यात आले आहे. कच्चा माल अधिकृत आणि परवानाधारक व्यापाऱ्यांकडूनच खरेदी करणे तसेच ओला व सुका कचरा यांचे योग्य नियोजन करणे हॉटेल आणि रेस्टॉरंट्ससाठी बंधनकारक केले आहे. याशिवाय, हॉटेल्समध्ये येणाऱ्या ग्राहकांना महागडे बाटलीबंद पाणी विकत घेण्याची सक्ती करता येणार नाही. हॉटेलचालकांनी ग्राहकांना मोफत, स्वच्छ आणि सुरक्षित आरआरओ किंवा फिल्टर केलेले पिण्याचे पाणी देणे अनिवार्य करण्यात आले आहे.

अन्नपदार्थांमधील भेसळ, शिळे अन्न विकणे आणि अत्यंत अस्वच्छ वातावरणात स्वयंपाक करणाऱ्या आस्थापनांवर प्रशासनाने कडक कारवाईचा बडगा उगारला असून, नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर यापुढेही कठोर पावले उचलली जाणार आहेत. ग्राहकांना अन्न सुरक्षेशी संबंधित कोणतीही तक्रार करायची असल्यास ‘एफएसएसएआय’च्या १८०० ११२ १०० या टोल फ्री क्रमांकावर किंवा ‘Food Safety Connect’ ॲपद्वारे फोटोसह तक्रार नोंदवता येते, तसेच अन्न व औषध प्रशासन कार्यालयात थेट लेखी तक्रार करण्याची सोय उपलब्ध असून तक्रारदाराचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाते.

Total Visitors :
4575876
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *