खाकीला कलंक; लग्नाचे आमिष दाखवून महिला वकिलाचे लैंगिक शोषण, हवालदारावर गुन्हा दाखल

Gramin Varta
41 Views

बारामती: बारामतीमध्ये एका महिला वकिलाने पोलीस खात्यात कार्यरत असलेल्या पोलीस हवालदाराविरुद्ध लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक, लैंगिक शोषण, आर्थिक गैरफायदा आणि मुलीचा स्वीकार करण्यास नकार दिल्याप्रकरणी गंभीर गुन्हा दाखल केला आहे. कायदेशीर कारणास्तव पीडितेची ओळख गोपनीय ठेवण्यात आली असून तिचा उल्लेख निर्भया असा करण्यात आला आहे. बारामती शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार, आरोपी रमेश मोहन जाधव हा पोलीस हवालदार असून त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये २७ जुलै २०२६ रोजी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

फिर्यादीच्या तक्रारीनुसार, आरोपीने लग्नाचे आश्वासन देत तिच्याशी जवळीक वाढवली. त्यानंतर आपल्या नातेवाईक सह तिच्या घरी जाऊन विवाहाबाबत चर्चा केल्यामुळे त्याच्या आश्वासनावर तिचा विश्वास अधिक दृढ झाला. काही दिवसांनी आरोपीने एका मंदिरात स्वतःच्या गळ्यातील साखळी तिच्या गळ्यात मंगळसूत्र म्हणून घालत आता तू माझी कायदेशीर पत्नी आहेस, असे सांगितले. त्यानंतर त्याने जेऊर आणि निंभोरे परिसरात तिचा पत्नी म्हणून परिचय करून देत काही काळ सहजीवन केल्याचा आरोप आहे. या सहजीवनादरम्यान महिला गर्भवती राहिली.

गर्भधारणा झाल्यानंतर आरोपीच्या वागणुकीत बदल झाला. त्याने तिची कोणतीही शारीरिक, मानसिक किंवा आर्थिक जबाबदारी स्वीकारली नाही. उलट संशय घेणे, वाद घालणे, आवश्यक उपचारासाठी मदत न करणे आणि गर्भधारणेदरम्यान तिला एकटे सोडणे, अशा प्रकारचा त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. २० डिसेंबर २०२५ रोजी फिर्यादीने एका मुलीला जन्म दिला. ही मुलगी आरोपीपासून झालेली असल्याचा दावा तिने केला असून, मुलीच्या जन्मानंतरही आरोपीने तिला किंवा मुलीला स्वीकारण्यास नकार दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलिसांकडून मोबाईल कॉल रेकॉर्डिंग, कॉल डिटेल रेकॉर्ड, व्हॉट्सअॅप चॅट, संदेश, छायाचित्रे, व्हिडिओ, बारामतीतील लॉजची नोंदवही, सीसीटीव्ही फुटेज, मंदिरातील सीसीटीव्ही, संबंधित साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय व प्रसूतीचे अभिलेख, आर्थिक व्यवहारांची बँक कागदपत्रे तसेच इतर डिजिटल आणि दस्तऐवजीय पुरावे जप्त करून त्यांची पडताळणी केली जाणार आहे. पुढील तपास बारामती शहर पोलीस करत आहेत.

- Advertisement -

Total Visitors :
4598479
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *