तुकाराम मुंढे यांचा मोर्चा आता शाळेकडे, ‘हे’ पदार्थ विकण्यास आणि खाण्यास बंदी

Gramin Varta
430 Views

मुंबई : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य जपण्यासाठी आणि त्यांना सकस, सुरक्षित व संतुलित आहार मिळवून देण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केलेल्या नवीन आदेशानुसार, राज्यातील सर्व शाळांच्या ५० मीटरच्या परिघात उच्च चरबीयुक्त आणि जंक फूड विकण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. इतकेच नव्हे, तर शाळेत आणि परिसरात कोणत्या पदार्थांना मनाई असेल, याची अधिकृत यादीच प्रशासनाने जाहीर केली आहे.

नवीन नियमावलीनुसार, शाळेच्या ५० मीटरच्या अंतरात येणारी दुकाने, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि पुरवठादारांना भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाचे सर्व निकष पाळणे अनिवार्य असेल. राज्यातील लहान बालकांपासून ते बारावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना आणि शासकीय, निमशासकीय, अनुदानित तसेच विनाअनुदानित शाळा, वसतिगृहे व अंगणवाड्यांना हे नियम लागू राहतील.

अन्न आणि औषध प्रशासनाने जाहीर केलेल्या यादीनुसार विविध पदार्थांच्या विक्रीवर आणि पुरवठ्यावर कडक बंदी असेल. यामध्ये तळलेले व फास्ट फूड म्हणून समोसे, कचोरी, भजी, फ्रेंच फ्राईज आणि फ्राईड चिकनचा समावेश आहे, कारण हे पदार्थ वारंवार वापरलेल्या तेलात किंवा वनस्पती तुपात बनवले जात असल्याने आरोग्यास अत्यंत घातक मानले जातात. तसेच बेकरी उत्पादनांमध्ये केक, पेस्ट्री, कुकीज, बिस्किट्स आणि डोनट्सवर बंदी असेल, तर पॅक केलेले स्नॅक्समध्ये मायक्रोवेव्हमध्ये बनवले जाणारे पॉपकॉर्न आणि फ्रोजन पिझ्झा समाविष्ट आहेत.

याशिवाय फॅट्स आणि स्प्रेड्समध्ये वनस्पती तूप व स्टिक मार्जरीन तसेच इतर घटकांमध्ये नॉन-डेअरी कॉफी क्रीमर आणि केकसाठी वापरले जाणारे रेडीमेड फ्रॉस्टिंग किंवा आइसिंगवरही पूर्ण प्रतिबंध असणार आहे.

- Advertisement -

शाळांमधील कँटीन, वसतिगृहे आणि अंगणवाड्यांना आता अन्न परवाना घेणे बंधनकारक करण्यात आले असून, विनापरवाना कोणत्याही शाळेत किंवा परिसरात अन्न पुरवठा करता येणार नाही. नियम मोडणाऱ्या दुकानदारांवर, स्टॉलधारकांवर आणि शाळा व्यवस्थापनावर अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

Total Visitors :
4602567
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *