रत्नागिरी: रत्नागिरी रेल्वे स्थानक परिसरातील शेअर रिक्षा स्टॉपवरून रिक्षाचालकांमध्ये वाद वाढत असल्याचे समोर आले आहे. काही जुन्या रिक्षाचालकांकडून नवीन रिक्षाचालकांना रिक्षा उभी करण्यास विरोध केला जात असून अरेरावी, शिवीगाळ व दादागिरी करून धमकावले जात आहे.
याबाबत रिक्षाचालक योगेश श्रीकृष्ण गानू यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) तसेच रत्नागिरी पोलीस यांच्याकडे न्याय मिळावा म्हणून अर्ज दिला होता. मात्र अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्याची कैफियत श्री. गानू यांनी पत्रकाद्वारे मांडली आहे.
श्री. गानू यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित ठिकाणी काही रिक्षाचालक दारूच्या नशेत गोंधळ घालतात. काही दिवसांपूर्वी एका रिक्षाचालकाला मारहाणही झाली होती. दि. २९ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे साडेअकरा वाजण्याच्या सुमारास सुहास पावसकर, रियाज मखानदार आणि सिकंदर (रियाज मखानदार यांच्या बहिणीचे पती) यांनी श्री. गानू यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
या सर्व प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, रेल्वे स्थानक परिसरातील रिक्षा व्यवस्थेची तपासणी करावी आणि सर्व रिक्षाचालकांना समान संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी श्री. गानू यांनी केली आहे.





