मुंबई-गोवा महामार्गावर आरवली ते बावनदी दरम्यान खड्डे पडण्यास सुरूवात

Gramin Varta
177 Views

महामार्गाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह; ठेकेदार सुस्त; वाहनचालकांमधून संताप व्यक्त

संगमेश्वर- मुंबई-गोवा महामार्गावरील आरवली ते बावनदी हद्दीत  पावसाने खड्डे पडण्यास पुन्हा सुरुवात झाली आहे. महामार्गावरील गोळवली येथील सनराईज हॉटेलच्या समोर असलेल्या पुलानजीक गोव्याकडे जाणाऱ्या लेनवर खड्ड्यांची समस्या वारंवार निर्माण होत आहे. त्याच दिशेच्या लेनवर मोठा खड्डा पडला आहे. या खड्ड्यांमुळे महामार्गाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून ठेकेदार मात्र सुस्त असल्याने वाहनचालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

हा खड्डा खोलवर असून येथे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. हा खड्डा अपघातांना निमंत्रण देत असून यापूर्वीही याच ठिकाणाच्या खड्ड्यांमुळे अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत. मात्र याबाबत महामार्ग प्रशासन मात्र सुस्त असल्याचे दिसून येत आहे. चौपदरी महामार्गावर संगमेश्वर तालुक्याच्या हद्दीत गोव्याकडे जाणाऱ्या लेनवर आरवली ते बावनदी दरम्यान दरवर्षी पावसाळ्यात खड्ड्यांची समस्या वाहनधारकांना डोकेदुखी ठरत आहे. काही दिवसांपूर्वी महामार्ग ठेकेदार प्रशासनाकडून सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर मातीच्या साहाय्याने बुजविण्यात आले.

ठेकेदार प्रशासनाने अनोखी शक्कल लढवून येथील खड्ड्यांची दरवर्षीप्रमाणे मलमपट्टी केली खरी, परंतु गेल्या काही दिवसांतील पावसाने पुन्हा खड्डे डोके वर काढू लागले आहेत.रत्नागिरी दिशेने जाताना महामार्गावरील मोठा खड्डा पडला असून, तो वाहतुकीला धोकादायक ठरत आहे. खोल खड्डा असून त्यात पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनधारकांना त्या खड्ड्याचा अंदाजच येत नसल्याने दुचाकी आणि चारचाकी वाहने खड्ड्यात आदळत आहेत. यामुळे वाहनधारकांचे वाहनावरील नियंत्रण सुटून मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
 
महामार्गावरील गोळवली येथील ते खड्डे वाहनं चालकांना डोकेदुखी ठरत आहेत वारंवार सुचना देऊन संबंधित ठेकेदार यांच्याकडून जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. गेल्या चार दिवसांत तिथे दुचाकीचे अपघात होताना दिसत आहेत. संबंधित ठेकेदाराने १५ ऑगस्टपर्यंत आरवली ते बावनदी दरम्यान जेवढे खड्डे पडले आहेत ते सिमेंट कॉंक्रिटने न भरल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता आम्ही त्याच खड्ड्यात वृक्षारोपण करणार असल्याचा इशारा संगमेश्वर भाजपचे सरचिटणीस डॉ. अमित ताठरे यांनी दिला आहे.

Total Visitors :
4610035
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *