चिपळूण, दापोली आणि गुहागर विधानसभा मतदारसंघ १००% गृहभेटी पूर्ण करून राज्यात पहिल्या तीन क्रमांकावर
रत्नागिरी : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात (SIR 2026) रत्नागिरी जिल्ह्याने संपूर्ण महाराष्ट्रात चमकदार कामगिरी केली आहे. या कार्यक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यातील गृहभेटींचे १०० टक्के काम पूर्ण करण्यात जिल्ह्यातील २६५-चिपळूण, २६३-दापोली आणि २६४-गुहागर हे तीन विधानसभा मतदारसंघ राज्यात अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय ठरले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मनुज जिंदल यांनी या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संपूर्ण निवडणूक यंत्रणेचे कौतुक केले आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या १४ मे २०२६ च्या पत्रान्वये महाराष्ट्र राज्यासाठी मतदार यादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR) २०२६ जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमानुसार ३० जून २०२६ पासून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याद्वारे मतदारांच्या घरोघरी भेट देऊन गणना प्रपत्र (Enumeration Form) वाटप व संकलनाचे काम रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आले होते.
या महत्त्वपूर्ण मोहिमेच्या पहिल्या टप्प्यातील गृहभेटी कार्यक्रमातील कार्यवाही १०० टक्के पूर्ण करणारे महाराष्ट्रातील पहिले तीन मतदारसंघ रत्नागिरी जिल्ह्यातील ठरले आहेत, जे जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे.
राज्यातील प्रथम तीन मतदारसंघ आणि त्यांचे अधिकारी खालीलप्रमाणे:
महाराष्ट्रामध्ये प्रथम: २६५ – चिपळूण विधानसभा मतदारसंघ (मतदार नोंदणी अधिकारी – आकाश लिगाडे)
महाराष्ट्रामध्ये द्वितीय: २६३ – दापोली विधानसभा मतदारसंघ (मतदार नोंदणी अधिकारी – डॉ. विजयकुमार सूर्यवंशी)
महाराष्ट्रामध्ये तृतीय: २६४ – गुहागर विधानसभा मतदारसंघ (मतदार नोंदणी अधिकारी – वैशाली पाटील)
जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांच्या मार्गदर्शनाखाली वरील मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात हे काम विहित वेळेत पूर्ण करण्यात आले.
या घवघवीत यशामध्ये २६५-चिपळूण, २६३-दापोली व २६४-गुहागर विधानसभा मतदारसंघातील सर्व सहायक मतदार नोंदणी अधिकारी, अतिरिक्त सहायक मतदार नोंदणी अधिकारी, निवडणूक नायब तहसीलदार, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO), सहायक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (ABLO), BLO सुपरवायझर व डाटा एंट्री ऑपरेटर या सर्वांचा सिंहाचा वाटा असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.





