सह्याद्री शिक्षण संस्था सेवकांची ६२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात; सोसायटीला ७४.६२ लाखांचा निव्वळ नफा तर १५ टक्के लाभांश जाहीर

Gramin Varta
79 Views

चिपळूण : येथील सह्याद्री शिक्षण संस्था सेवकांची सहकारी सोसायटीची ६२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा विविध उपक्रम, गुणवंतांचा गौरव आणि मान्यवरांच्या मार्गदर्शनाने अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या सभेत सोसायटीच्या वर्षभरातील कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला असून, गत आर्थिक वर्षात सोसायटीला ७४ लाख ६२ हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच सभासदांना १५ टक्के लाभांश जाहीर करण्यात आल्याने सह्याद्री परिवारात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

सभेची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली असून, यावेळी सह्याद्री शिक्षण संस्थेचे संस्थापक, माजी खासदार स्व. गोविंदरावजी निकम तसेच संस्थेच्या माजी अध्यक्षा स्व. अनुराधाताई निकम यांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच अहवाल सालात दिवंगत झालेल्या मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सोसायटीचे उपाध्यक्ष शैलेश सुर्वे यांनी प्रास्ताविक केले तर अध्यक्ष नामदेव गावडे यांनी वार्षिक अहवालाचे वाचन करून सोसायटीच्या आर्थिक व प्रशासकीय कामकाजाचा आढावा सभेसमोर मांडला. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात सोसायटीच्या ठेवींमध्ये १ कोटी रुपये, भागभांडवलात ३५ लाख रुपये आणि कर्जवाटपात १ कोटी रुपयांची वाढ झाल्याचे त्यांनी नमूद केले. सभासदांच्या अफाट विश्वास व सहकार्यामुळे सोसायटीची आर्थिक वाटचाल अधिक सक्षमपणे सुरू असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.

या भव्य सभेत सह्याद्री शिक्षण संस्थेत विशेष उल्लेखनीय कामगिरी करणारे शिक्षक, सेवानिवृत्त कर्मचारी तसेच माध्यमिक शाळांच्या परीक्षेत आणि इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान संस्थेचा इतिहास, विविध शैक्षणिक उपक्रम आणि सुविधांची माहिती देणाऱ्या ‘सह्याद्री शिक्षण संस्था माहिती पत्रिका’चे आणि लेखक राजेंद्रकुमार वारे यांच्या ‘गोपनीय अहवाल लेखन’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम यांनी आपल्या मनोगतात संस्थेची शैक्षणिक क्षेत्रातील प्रगती आणि शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या योगदानाविषयी सविस्तर माहिती दिली. सावर्डे विद्यालयाने ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात मिळवलेले प्रथम स्थान, खेर्डी विद्यालयाचे शिष्यवृत्ती व सीईटी परीक्षेतील यश, कॉम्पिटिटिव्ह अकॅडमीचा विस्तार, अत्याधुनिक रोबोटिक्स लॅब, वरिष्ठ महाविद्यालयाला मिळालेला नॅक ‘बोग्रेड’ आणि फार्मसी विभागातील संशोधन पेटंट्सचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला. सह्याद्री शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. इसहाक खतीब यांनीही मनोगत व्यक्त करत स्व. गोविंदरावजी निकम यांच्या प्रेरणेने आणि आमदार शेखरजी निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेली संस्थेची प्रगती अत्यंत प्रेरणादायी असल्याचे सांगितले.

- Advertisement -

या सर्वसाधारण सभेस सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम, उपाध्यक्ष प्रशांत निकम, उपाध्यक्षा युगंधरा ताई राजेशिर्के, उपाध्यक्ष डॉ. इसहाक खतीब, सेक्रेटरी महेश महाडिक, संचालक चंद्रकांत सुर्वे, मारुतीराव घाग, गुलाबराव सुर्वे, हरिश्चंद्र सुर्वे, जिल्हा परिषद सदस्या पुजाताई निकम, जिल्हा परिषद सदस्य संजय कदम, पंचायत समिती सदस्या पूजा पाष्टे, सोसायटीचे माजी अध्यक्ष विजय काटे यांच्यासह सह्याद्री परिवारातील सर्व संचालक, शिक्षक, कर्मचारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सतीश पालकर व सचिन पोकळे यांनी केले तर आभार तुकाराम पाटील यांनी मानले.

Total Visitors :
4662207
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *