लांजा ते थेट नवी दिल्ली: जॅकफ्रूट किंग मिथिलेश देसाई यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे फणस शेतीला राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून देण्याची मागणी

Gramin Varta
586 Views

लांजा : तालुक्यातील झापडे गावातील प्रगतशील शेतकरी तथा जॅकफ्रूट किंग म्हणून ओळखले जाणारे मिथिलेश देसाई यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन फणस शेती आणि कृषी परिसंस्थेबाबत महत्त्वपूर्ण चर्चा केली. वडिलांच्या स्वप्नांना आणि त्यांच्या अहोरात्र कष्टांना या भेटीमुळे खऱ्या अर्थाने फळ आले असून ही लांजा तालुका, रत्नागिरी जिल्हा तसेच संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाची बाब ठरली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने कामाची दखल घेत शेती क्षेत्रासाठी अमूल्य मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ही महत्त्वाची संधी उपलब्ध करून दिली. शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे फणस शेती आणि त्यावरील संपूर्ण कृषी परिसंस्थेमध्ये सुरू असलेल्या कार्याची माहिती देत या भेटीचा योग जुळवून आणला. पवार साहेब आणि शेती यांच्यातील अटूट नाते या संपूर्ण घटनाक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून, यासाठी मिथिलेश देसाई यांनी पवार कुटुंबियांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या या उच्चस्तरीय बैठकीत मिथिलेश देसाई यांनी आपल्या वडिलांपासून सुरू असलेल्या फणस शेतीविषयक कामाची सविस्तर माहिती सादर केली. सध्या भारतामध्ये पंच्याऐंशी टक्के भागात फणस उपलब्ध असून योग्य प्रक्रिया न झाल्यामुळे तो मोठ्या प्रमाणावर वाया जातो. या फणसाची एकूण जागतिक व देशांतर्गत अर्थव्यवस्था ही दोन अब्ज डॉलर्सची असून, आगामी वर्षाला भारताचे फणस वर्ष म्हणून घोषित करण्यात यावे, अशी आग्रही विनंती त्यांनी पंतस्रधानांना केली.

या भेटीदरम्यान फणसापासून तयार करण्यात आलेल्या विविध नाविन्यपूर्ण उत्पादनांचे प्रदर्शन व सादरीकरण करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने मधुमेहाच्या रुग्णांसाठी उपयुक्त फणसाचे पीठ, प्रथिनांनी समृद्ध असणाऱ्या बियांचे पीठ, पिकलेल्या फणसाचे चिप्स यांसह फणसाच्या सालीपासून तयार करण्यात आलेल्या डफलग बँग आणि पासपोर्ट होल्डर यांसारख्या पर्यावरणपूरक व उच्च दर्जाच्या वस्तूंचा समावेश होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे सर्व उपक्रम व उत्पादने अत्यंत आस्थेने समजून घेतली असून सर्व संबंधित कागदपत्रे व उत्पादने स्वीकारत या कामाची सविस्तर माहिती मागितली आहे. लांजा तालुक्यातील एका सामान्य गावतून सुरू झालेला हा प्रवास आता थेट देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचल्यामुळे संपूर्ण कोकणात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisement -

Total Visitors :
4680556
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *