संशयित व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात
खेड : खेड बसस्थानकात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, भरदिवसा एका महिला व तिच्या मुलीची छेडछाड केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (११ ऑगस्ट) दुपारी घडली. ग्रामीण भागात जाणाऱ्या एसटी बसची प्रतीक्षा करत असताना दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास एका व्यक्तीने महिला व तिच्या मुलीसोबत गैरवर्तन केल्याचे समोर आले. या प्रकारामुळे बसस्थानक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले. पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे परिस्थिती नियंत्रणात आली. मात्र, खेड बसस्थानक परिसरात महिलांसोबत गैरवर्तनाच्या घटना वारंवार घडत असल्याचा आरोप प्रवाशांकडून करण्यात येत असून, या पार्श्वभूमीवर महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
बसस्थानकात ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने महिला व मुली प्रवासासाठी येत असतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बसस्थानक परिसरात नियमित तसेच प्रभावी पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी बसस्थानक परिसरातील सुरक्षाव्यवस्था अधिक सक्षम करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.






