सावर्डे / सचिन साडविलकर: माजी सभापती व जिल्हा परिषद सदस्य सौ. पूजा शेखर निकम यांनी चिपळूण तालुक्यातील सावर्डे प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील आरोग्य सुविधा, उपलब्ध औषधसाठा आणि नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्य सेवांचा सविस्तर आढावा घेतला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी आरोग्य केंद्रातील औषध भांडारगृहाची पाहणी करत उपलब्ध औषधसाठ्याची आणि रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असलेल्या औषधांची स्थिती जाणून घेतली. नागरिकांना उपचारासाठी आवश्यक औषधे वेळेत उपलब्ध होणे गरजेचे असून, रुग्णांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी संबंधितांनी विशेष दक्षता घ्यावी, अशा स्पष्ट सूचना त्यांनी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.
सध्याच्या दूषित पाण्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य केंद्रात तपासणीसाठी आलेल्या पाण्याचे नमुने तत्काळ जैविक व रासायनिक चाचणीसाठी पाठवून त्याचे अहवाल लवकरात लवकर मिळवण्याचे निर्देश सौ. निकम यांनी दिले. या तपासणीनंतर पाणी पिण्यायोग्य आहे किंवा नाही, याची माहिती तातडीने ग्रामस्थांपर्यंत पोहोचवावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच, आरोग्य केंद्रात साठवलेल्या लसी व वॅक्सिन खराब होऊ नयेत, यासाठी वीज पुरवठा अखंडित राहणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगत, त्यांनी सावर्डे विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधून या समस्येचे गांभीर्य प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राशी संबंधित प्रलंबित प्रश्न आणि आवश्यक सोयीसुविधांबाबतही त्यांनी सविस्तर चर्चा केली. आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मांडलेल्या अडचणी आणि मागण्या समजून घेत, लोकप्रतिनिधी म्हणून प्रशासनाच्या माध्यमातून या समस्या सोडवण्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करू आणि आवश्यक पाठपुरावा करू, अशी ग्वाही सौ. पूजा शेखर निकम यांनी दिली. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र सावर्डेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रुबीना नायकवडे यांच्यासह आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेविका आणि सर्व कर्मचारी उपस्थित होते.






