राजापूरच्या ओझर नं. १ शाळेच्या सुवर्णकन्यांची राज्यस्तरावर धडक

Gramin Varta
20 Views

तुषार पाचलकर / राजापूर : जिल्हा अथलिट असोसिएशनच्या वतीने रविवारी (दि. ९ ऑगस्ट २०२६) डेरवण येथे विविध वयोगटांतील अथलिट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा ओझर नं.-१ मधील चौदा वर्षांखालील वयोगटातील विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये कुमारी दुर्वा मंगेश गुरव, श्रुती नरेश पळसमकर, पल्लवी पांडुरंग मालपेकर आणि कुमार सार्थक जयेंद्र मालपेकर यांचा समावेश होता. ट्रायथलोन बी गटात साठ मीटर धावणे, लांब उडी आणि बॅक थ्रो या तीन क्रीडाप्रकारांचा समावेश होता.

या ट्रायथलोन बी गटात जिद्द आणि कौशल्याच्या बळावर शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. शाळेची विद्यार्थिनी कुमारी दुर्वा मंगेश गुरव हिने द्वितीय क्रमांक पटकावला, तर कुमारी श्रुती नरेश पळसमकर हिने तृतीय स्थान मिळवले. या सुवर्णयशाच्या जोरावर कुमारी दुर्वा मंगेश गुरव हिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विशेष म्हणजे, याआधी रग्बी जिल्हा असोसिएशनतर्फे आयोजित स्पर्धांमध्येही या सर्व विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत राज्य पातळीवर आपले कौशल्य सिद्ध केले होते.

विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशामागे व्ही फिटनेस सेंटरचे प्रशिक्षक युवराज मोरे, गावचे सरपंच विकास रेगे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मानसी गुरव, शाळेचे मुख्याध्यापक रामचंद्र मोरे, शिक्षक शैलेंद्र बंदसोडे आणि राष्ट्रीय कबड्डी पंच तथा शिक्षक दत्तात्रय गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच गावातील ग्रामस्थ व पालकांचे सहकार्यही मोलाचे ठरले. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळा आणि परिसरातून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

- Advertisement -
Total Visitors :
4693489
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *