कॅरोके सिंगिंग आणि स्नेहमेळाव्याने रंगली चिपळूण जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनची अविस्मरणीय संध्याकाळ
चिपळूण : चिपळूण जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनतर्फे (सीजीपीए) आयोजित ‘आषाढरंग २०२६’ हा अभिनव सांस्कृतिक व स्नेहमेळावा हॉटेल अभिरुची येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कॅरोके सिंगिंग, गप्पा आणि स्नेहमेळाव्यामुळे रंगलेली ही संध्याकाळ सीजीपीए परिवारासाठी अविस्मरणीय ठरली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सीजीपीएचे अध्यक्ष डॉ. संदीप भागवत यांनी मनोगत व्यक्त करून वर्षभर संघटनेच्या विविध उपक्रमांना सदस्यांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आभार मानले. तसेच वर्षभरातील सामाजिक, वैद्यकीय, सांस्कृतिक आणि संघटनात्मक उपक्रमांचा आढावा PPTच्या माध्यमातून सादर केला.
डॉ. विशाल पेटकर यांच्या उत्साहपूर्ण सूत्रसंचालनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर झालेल्या कॅरोके सिंगिंगमध्ये सीजीपीएच्या डॉक्टर सदस्यांनी एकापेक्षा एक सरस गाणी सादर करून उपस्थितांची मने जिंकली. अनेक डॉक्टरांनी अल्प वेळेत सराव करून उत्स्फूर्तपणे सादरीकरण केले. डॉ. मंगेश वाजे आणि डॉ. रणजीत पाटील यांनी खुमासदार सूत्रसंचालन करत कार्यक्रमात रंगत आणली. डॉ. अतीन औताडे यांच्या विशेष सहकार्यामुळे कार्यक्रमाचे आयोजन अधिक सुरेखपणे पार पडले.
‘आषाढरंग’ हा केवळ सांस्कृतिक कार्यक्रम न राहता सीजीपीए परिवारातील स्नेह, एकजूट, कलागुण आणि परस्परांतील जिव्हाळ्याचा सुंदर उत्सव ठरला. उत्स्फूर्त प्रतिसादामुळे या स्नेहमेळाव्याचे रूपांतर एका छोटेखानी ‘मिनी गॅदरिंग’मध्ये झाले.
यावेळी डॉ. औताडे, डॉ. विखारे, डॉ. संतोष दाभोळकर, डॉ. सुभाष उतेकर, डॉ. राकेश चाळके, डॉ. नितीन शिंदे, डॉ. कृष्णकांत पाटील, डॉ. चैतन्य खोत, डॉ. चेतन पाटील, डॉ. संतोष पाटील, डॉ. प्रसाद खातू, डॉ. दळी, डॉ. निरंजन तांबे, डॉ. संदीप दाभोळकर, डॉ. ऋषिकेश चितळे, डॉ. समिध चिकटे, डॉ. दंडगे, डॉ. मन्सूर परकार, डॉ. खांबे यांच्यासह चिपळूण व परिसरातील बहुसंख्य डॉक्टर्स आणि महिला डॉक्टर्स उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व सदस्यांचे तसेच उत्स्फूर्त सहभाग नोंदविणाऱ्या संपूर्ण सीजीपीए परिवाराचे सेक्रेटरी डॉ. ओंकार बेल्लारीकर, डॉ. अभिजीत दुधाळ आणि डॉ. स्नेहल जोशी यांनी असोसिएशनच्या वतीने मनःपूर्वक आभार मानले.
‘आषाढरंग’मध्ये सीजीपीए डॉक्टरांचा सुरेल कलाविष्कार!
Leave a Comment





