दागिन्यांसाठी आई-मुलाचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषण; ग्रामीण पोलिसांच्या भूमिकेवर संताप

Gramin Varta
255 Views

वयोवृद्ध आईसह मुलाला न्याय कोण मिळवून देणार?

रत्नागिरी /प्रतिनिधी : स्वतःच्या मालकीचे मौल्यवान सोन्याचे दागिने नातेवाईकाकडे सुरक्षिततेसाठी ठेवले; मात्र वर्षानुवर्षे मागणी करूनही ते परत मिळत नसल्याचा आरोप करीत एका वृद्ध महिलेसह तिच्या मुलाने आज, स्वातंत्र्यदिनी, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू केले. दागिने परत मिळावेत यासाठी ग्रामीण पोलीस ठाणे आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे वारंवार तक्रारी करूनही अपेक्षित कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, घराची डागडुजी करावयाची असल्याने घरातील मंगळसूत्र, दोन अंगठ्या, ब्रेसलेट, चैन आणि कानातील टॉप आदी सोन्याचे दागिने चोरीपासून सुरक्षित राहावेत म्हणून २०१७ पूर्वी त्यांच्या सख्ख्या बहिणीकडे ठेवण्यात आले होते. मात्र दागिने परत मागितल्यानंतर ‘आज देते, उद्या देते’ अशी टाळाटाळ सुरू राहिली. अखेर ७ मार्च २०२६ रोजी दागिन्यांची मागणी केली असता, दागिने परत देण्यास स्पष्ट नकार देत उर्मट भाषेत उत्तर देण्यात आल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. या प्रकरणी ९ मार्च रोजी ग्रामीण पोलीस ठाणे, कारवांचीवाडी येथे तक्रार अर्ज देण्यात आला. मात्र अपेक्षित दखल न घेतल्याने २३ मार्च रोजी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडेही तक्रार करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी गैरअर्जदाराचा जबाब घेतला; मात्र तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, त्यांना समक्ष बोलावून सविस्तर चौकशी न करता प्रकरणाची उथळपणे हाताळणी करण्यात आली.

विशेष म्हणजे, २३ मार्चच्या पत्राची प्रत तक्रारदारांना तब्बल २८ एप्रिल रोजी मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. पोलिसांकडून पत्रव्यवहार होण्यासही महिनाभराचा कालावधी लागत असेल, तर सामान्य नागरिकाने न्यायासाठी नेमके किती दिवस प्रतीक्षा करायची, असा संतप्त सवाल या घटनेमुळे उपस्थित होत आहे. तक्रारदारांनी २७ एप्रिल आणि १८ मे रोजी पुन्हा जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पत्रव्यवहार करूनही अपेक्षित न्याय मिळाला नसल्याचे म्हटले आहे. मौल्यवान दागिन्यांचा प्रश्न असूनही तक्रारीकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे ‘तक्रार करा, पत्रव्यवहार करा आणि प्रतीक्षा करा’ एवढ्यापुरतीच पोलिसांची भूमिका राहणार का, असा सवालही उपोषणकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, उपोषणस्थळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक पालवे यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांची व्यथा जाणून घेतली. त्यांनी दोघांशी चर्चा करून प्रकरणाची माहिती घेतली. नव्या अधिकाऱ्यांच्या भेटीमुळे या प्रकरणाला आता योग्य दिशा मिळणार का आणि वर्षानुवर्षे रखडलेला दागिन्यांचा वाद मार्गी लागणार का, याकडे आता लक्ष लागले आहे. वयोवृद्ध आई आणि तिच्या मुलाला न्यायासाठी उपोषणाची वेळ येणे ही केवळ एका कुटुंबाची व्यथा नसून, तक्रारींच्या निवारणाच्या प्रशासकीय यंत्रणेपुढे उभा ठाकलेला गंभीर प्रश्न आहे. मौल्यवान वस्तूंच्या परताव्याचा वाद नेमका कायदेशीर स्वरूपाचा आहे, याचा तपास करून वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणेची आहे. आरोपांची सत्यता तपासून निष्पक्ष चौकशी झाली, तरच या प्रकरणातील संशयाचे धुके दूर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक नितीन बगाटे स्वतः दखल घेणार?

वर्षानुवर्षे तक्रारी करूनही आपल्या मौल्यवान दागिन्यांचा प्रश्न मार्गी लागत नसल्याच्या आरोपातून वयोवृद्ध आई आणि तिच्या मुलावर अखेर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषणाची वेळ आली आहे. रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाणे तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे वारंवार अर्ज, पत्रव्यवहार करूनही अपेक्षित न्याय मिळाला नसल्याची त्यांची व्यथा आहे. मात्र जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने हाताळण्यासाठी ओळख निर्माण केलेले कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी आता या प्रकरणाची स्वतः दखल घेणे गरजेचे आहे. दागिने खरोखरच तक्रारदारांचे असतील तर ते परत मिळवून देण्यासाठी कायदेशीर मार्गाने ठोस कार्यवाही होणार का? दुसरीकडे तक्रारीतील आरोपांमध्ये तथ्य नसेल, तरी निष्पक्ष चौकशीतून ते स्पष्ट होणे आवश्यक आहे. त्यामुळे या प्रकरणात कोणाच्याही बाजूने झुकाव न ठेवता सत्य समोर आणणे आणि कायद्याच्या चौकटीत योग्य निर्णय घेणे, हीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे. वयोवृद्ध आईला न्यायासाठी उपोषणाला बसण्याची वेळ येऊ नये, हीच प्रशासनाची खरी कसोटी आहे. त्यामुळे आता नितीन बगाटे या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन या वयोवृद्ध आईसह मुलाला न्याय मिळवून देणार का, याकडे रत्नागिरीकरांचे लक्ष लागले आहे.

Total Visitors :
4704639
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *