भांडुप स्मशानभूमीत अंत्यसंस्कार
रत्नागिरी : आई-वडिलांच्या निधनानंतर मुलगा अंत्यसंस्कार करतो, अशी समाजातील पारंपरिक रूढी अनेक ठिकाणी आजही पाहायला मिळते. मात्र, या रूढी-परंपरांच्या पलीकडे जात आपल्या आईच्या चितेला अग्नी देत मुलीने केवळ अंत्यसंस्काराचे कर्तव्य पार पाडले नाही, तर ‘मुलगा-मुलगी समान’ या विचारालाही कृतीतून अधोरेखित केले. छाया चंद्रकांत सुवरे यांच्या निधनानंतर त्यांची मुलगी शामली चंद्रकांत सुवरे हिने आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला.
उक्षी बनाची वाडी हे माहेर असलेल्या आणि कोंडये गाव हे सासर असलेल्या छाया माणिक सापटे ऊर्फ छाया चंद्रकांत सुवरे यांचे भांडुप येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने कुटुंबीय, नातेवाईक आणि दोन्ही गावांतील ग्रामस्थांवर शोककळा पसरली.
या कुटुंबावर यापूर्वीच काळाने मोठा आघात केला होता. अवघ्या चार वर्षांपूर्वी छाया सुवरे यांचे पती चंद्रकांत सुवरे यांचेही हृदयविकाराने निधन झाले होते. पतीच्या निधनाचा धक्का पचवत असतानाच कुटुंब सावरत होते. मात्र, नियतीने पुन्हा एकदा घाला घालत छाया सुवरे यांनाही हिरावून घेतले. आई-वडिलांच्या निधनामुळे दोन्ही मुलींवर दुःखाचा डोंगर कोसळला. माहिती कळताच गावाकडील ग्रामस्थ मुंबईकडे रवाना झाले.
या परिस्थितीतही दोन्ही मुलींनी खचून न जाता आपल्या आईच्या अंत्यसंस्काराबाबत ठाम निर्णय घेतला. समाज काय म्हणेल, रूढी-परंपरांचे बंधन काय असेल, याचा विचार न करता ‘आईच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी आपणच पार पाडायची आणि मुलगा नसला तरी मुलाचे कर्तव्य आपण बजावायचे’, असा निर्धार त्यांनी केला.
मुलींच्या या निर्णयाला उक्षी आणि कोंडये गावातील ग्रामस्थांनीही मनापासून साथ दिली. त्यांच्या निर्णयाचा आदर करत ग्रामस्थांनी दोन्ही मुलींना प्रोत्साहन दिले आणि या कठीण प्रसंगी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यानंतर भांडुप येथील स्मशानभूमीत भावपूर्ण वातावरणात छाया सुवरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांची मुलगी शामली सुवरे हिने आपल्या आईच्या चितेला अग्नी देत मुलाचे कर्तव्य पार पाडले.
आईला अखेरचा निरोप देताना मुलींच्या डोळ्यांत अश्रू होते; मात्र त्याचवेळी आपल्या आईसाठी शेवटचे कर्तव्य आपणच पार पाडल्याचा ठाम भाव त्यांच्या कृतीतून दिसून आला. दुःखाच्या प्रसंगीही मुलींनी घेतलेल्या या धाडसी आणि संवेदनशील निर्णयाचे उपस्थित ग्रामस्थांनी कौतुक केले.
शामली सुवरे यांनी घेतलेला हा निर्णय केवळ एका कुटुंबापुरता मर्यादित नसून समाजातील बदलत्या विचारसरणीचे प्रतीक ठरला आहे. मुलगी ही केवळ ‘परक्याचे धन’ नसून तीही आई-वडिलांची जबाबदारी, प्रेम आणि कर्तव्य तितक्याच समर्थपणे निभावू शकते, हा संदेश या घटनेतून अधोरेखित झाला आहे. रूढी-परंपरांचा सन्मान राखतानाच काळानुरूप समाजाने स्वीकारलेल्या सकारात्मक बदलाचे हे भावनिक आणि अभिमानास्पद उदाहरण ठरले आहे.
आईच्या चितेला अग्नी देताना शामलीने आपल्या आईला अखेरचा निरोप दिला; पण त्याचवेळी ‘मुलगा नाही म्हणून कर्तव्य कमी होत नाही’, हा समाजाला विचार करायला लावणारा संदेशही दिला. उक्षी आणि कोंडये ग्रामस्थांनी या निर्णयाला दिलेली साथ हीदेखील तितकीच कौतुकास्पद असून, दुःखाच्या क्षणी समाजाने संवेदनशीलतेने आणि माणुसकीने कुटुंबाच्या पाठीशी उभे राहण्याचा आदर्श या घटनेतून निर्माण झाला आहे.
आईच्या चितेला मुलीने दिला अग्नी; उक्षी, कोंडये ग्रामस्थांची ‘मुलगा-मुलगी समान’ विचाराला कृतीतून साथ
Leave a Comment






