क्रिप्टो अ‍ॅपच्या माध्यमातून रत्नागिरीतील सेवानिवृत्ताची ८.६२ लाखांची फसवणूक; एफडीतील रक्कम परस्पर वळवून काढली

Gramin Varta
140 Views

रत्नागिरी : स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छांचे कार्ड तयार करण्यासाठी मोबाईलमध्ये अ‍ॅप डाउनलोड करणे रत्नागिरीतील एका ६१ वर्षीय सेवानिवृत्त व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर त्यांच्या इंडसइंड बँकेतील मुदत ठेवीच्या (एफडी) खात्यातील तब्बल ८ लाख ६२ हजार ४०० रुपयांची रक्कम सेव्हिंग खात्यात वळवून अज्ञात व्यक्तीने ती काढून घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात १७ ऑगस्ट २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१८(४) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० मधील कलम ६६(क) व ६६(ड) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रत्नागिरी शहरातील टिळक आळी परिसरात राहणारे ६१ वर्षीय सेवानिवृत्त व्यक्ती आहेत. १५ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ९.२४ वाजण्याच्या सुमारास त्यांनी मोबाईलमध्ये ‘क्रॅप्टो’ अ‍ॅप डाउनलोड केले होते. या अ‍ॅपच्या माध्यमातून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी कार्ड तयार केल्यानंतर त्यांनी ते अ‍ॅप मोबाईलमधून अनइन्स्टॉल केले.

त्यानंतर त्यांच्या इंडसइंड बँकेतील एफडी खात्यातून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने तब्बल ८ लाख ६२ हजार ४०० रुपये सेव्हिंग खात्यात वळवले आणि त्यानंतर ही संपूर्ण रक्कम काढून घेतली. आपल्या खात्यातून एवढी मोठी रक्कम परस्पर वळवून काढण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.

- Advertisement -

या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २८१/२०२६ नोंद करण्यात आला असून, अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. मोबाईलमध्ये अनोळखी अ‍ॅप डाउनलोड करताना नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, तसेच बँक खात्यांशी संबंधित संशयास्पद हालचाली आढळल्यास तत्काळ बँक व पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

Total Visitors :
4717935
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *