मुंबई/उदय दणदणे : महाराष्ट्राच्या समृद्ध पारंपरिक शाहिरी लोककलेतील कलगी–तुरा परंपरेचे जतन, संवर्धन आणि दस्तऐवजीकरण करण्याच्या उद्देशाने कलगी तुरा समाज उन्नती मंडळ, मुंबईच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘ब्रीदपूजन गुरुशिष्य सागरीत मांड’ या धार्मिक व सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, २७ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४ ते ७ या वेळेत परळ येथील कुणबी समाजोन्नती संघाच्या वाघे हॉलमध्ये हा सोहळा पार पडणार आहे.
कलगी–तुरा ही महाराष्ट्राच्या लोकपरंपरेशी घट्ट नाते सांगणारी समृद्ध शाहिरी कला असून, या परंपरेतील ब्रीद, विविध घराणी, गुरु–शिष्य परंपरा आणि ‘सागरीत मांड’ यांना विशेष सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. काळाच्या ओघात या परंपरेतील मौखिक स्वरूपातील अनेक माहिती लोप पावण्याची शक्यता असल्याने तिचे व्यवस्थित दस्तऐवजीकरण करण्यासाठी मंडळाने पुढाकार घेतला आहे.
या पार्श्वभूमीवर मंडळाच्या वतीने सर्व चिठ्ठी मालक, कलगी–तुरा शाहीर, कलाकार, सदस्य तसेच या लोककलेवर प्रेम करणाऱ्या रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ब्रीदपूजन सोहळ्याचे दर्शन घ्यावे आणि या सांस्कृतिक उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, मंडळाच्या वतीने ‘कलगी–तुरा : कुळ – घराणे – गुरु – शिष्य परंपरेची नोंद’ या महत्त्वपूर्ण ग्रंथाची दुसरी आवृत्ती लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहे. या ग्रंथामध्ये कलगी–तुरा कलेशी संबंधित विविध घराणी, त्यांची कुळपरंपरा, गुरु–शिष्य परंपरा, घराण्याचा इतिहास आणि उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संकलन करून ती पुढील पिढ्यांसाठी जतन करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
यासाठी ज्या चिठ्ठी मालकांकडे आपल्या घराण्याची सविस्तर माहिती, वंशपरंपरा, गुरु–शिष्य परंपरा, घराण्याचा इतिहास किंवा या कलेशी संबंधित अन्य महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध आहे, त्यांनी ती मंडळाकडे लवकरात लवकर जमा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. उपलब्ध माहितीचे संकलन आणि दस्तऐवजीकरण झाल्यास कलगी–तुरा परंपरेचा समृद्ध वारसा भविष्यातील पिढ्यांसाठी अधिकृत स्वरूपात उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
तसेच ज्यांना ‘कलगी–तुरा ब्रीदावर सागरीत’ करावयाची आहे, त्यांनी कार्यक्रमाच्या दिवशी वेळेत उपस्थित राहून आपली नोंद करावी, असेही मंडळाने स्पष्ट केले आहे.
याबाबत मंडळाचे सरचिटणीस संतोष धारशे यांनी सांगितले की, “आपली परंपरा हीच आपली ओळख आहे. या समृद्ध परंपरेचे दस्तऐवजीकरण करून ती पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे आहे.” त्यामुळे मुंबईसह राज्यातील कलगी–तुरा शाहीर, कलाकार, चिठ्ठी मालक, सदस्य आणि रसिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन परंपरेच्या जतनासाठी हातभार लावावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
कलगी-तुरा परंपरेच्या जतनासाठी मुंबईत २७ ऑगस्टला ‘ब्रीदपूजन’ सोहळा; घराण्यांच्या दस्तऐवजीकरणासाठी मंडळाचे आवाहन
Leave a Comment





