दापोली: मुर्डीतील ग्रामस्थ विनय जोशी यांच्या सतर्कतेमुळे जखमी समुद्री गरुडाला जीवदान

Gramin Varta
170 Views

दापोली : तालुक्यातील मुर्डी येथील ग्रामस्थ विनय जोशी यांच्या सतर्कतेमुळे आणि तत्परतेमुळे एका जखमी समुद्री गरुडाचे (Sea Eagle) प्राण वाचले आहेत.

विनय जोशी यांना गावामध्ये हा दुर्मिळ समुद्री गरुड गंभीर जखमी अवस्थेत आढळला. त्यांनी कोणतीही दिरंगाई न करता तत्काळ दापोली परिक्षेत्र वन अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली.

त्यांच्या या जागरूकतेनंतर कोंगळे बीटचे वनरक्षक प्रभू साबणे, ताडील बीटच्या वनरक्षक शुभांगी गुरव आणि प्राणीमित्र प्रफुल जोशी यांनी तातडीने मुर्डी येथे पोहोचून विनय जोशी यांच्याकडून जखमी पक्ष्याला सुरक्षितपणे ताब्यात घेतले.त्यानंतर दापोली येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत जखमी गरुडावर तातडीने प्रथमोपचार करण्यात आले.

पक्ष्याला अधिक वैद्यकीय देखरेखीची गरज असल्याने कांदळवन विभागाचे परिक्षेत्र वन अधिकारी निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला पुढील उपचारासाठी डहाणू येथील केंद्रात हलवण्यात आले आहे.

विनय जोशी यांनी दाखवलेल्या समयसूचकतेचे सर्वत्र कौतुक होत असून, नागरिकांनीही अशा प्रकारे जखमी वन्यजीव आढळल्यास थेट हस्तक्षेप न करता वन विभागाला किंवा १९२६ या टोल फ्री क्रमांकावर तातडीने माहिती द्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Total Visitors :
4730133
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *