दापोली: उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या, अडचणी आणि प्रलंबित मागण्या थेट राज्य शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी दापोली येथील भारतीय जनता पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात ‘सेवा अभियान’ अर्थात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले विविध प्रश्न आणि गारगाणी मांडली. प्रशासकीय यंत्रणा आणि सामान्य जनता यांच्यातील संवाद अधिक गतिमान करणे, तसेच जनसामान्यांच्या अडीअडचणींचे जागीच निवारण करणे, हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट होते. उपस्थित मान्यवरांनी नागरिकांच्या समस्या गांभीर्याने समजून घेत संबंधित विभागांमार्फत योग्य तो पाठपुरावा करून सर्व प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही दिली, तसेच आगामी काळातही अशा उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले जाईल असे स्पष्ट केले.
या अभियानाला भाजप प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांचे विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) संतोष साखरे आणि भाजप आमदार प्रमोद जठार यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. याप्रसंगी खेड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर, भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, जलगाव पंचायत समिती सदस्य श्रीराम इदाते, जिल्हा नियोजन समिती सदस्य केदार साठे, उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अक्षय फाटक, दापोली महिला मोर्चा तालुकाध्यक्षा जया साळवी, ग्रामविकास व पंचायत राज सेल जिल्हाध्यक्ष योगेश शिर्के, भाजप युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस प्रसाद मांडवकर, दापोली सोशल मीडिया संयोजक धिरज पटेल, खेड उपशहराध्यक्ष प्रणव मापुस्कर, शशांक सिनकर, प्रदीप भोसले, ओवैस चौगुले यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उत्तर रत्नागिरीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





