सरस्वती विद्यामंदिर पाचल येथे योग प्रशिक्षण शिबीर उत्साहात संपन्न

Gramin Varta
121 Views

पाचल (तुषार पाचलकर): विद्यार्थ्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहावे या उद्देशाने पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, पाचल येथे विशेष योग प्रशिक्षण आणि मार्गदर्शन शिबीराचे उत्साहात आयोजन करण्यात आले. ‘योगः कर्मसु कौशलम्’ या संकल्पनेवर आधारित पार पडलेल्या या शिबीराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या व कोल्हापूर येथील नाईट कॉलेजच्या योगशास्त्र विभागप्रमुख सौ. मनीषा बृहस्पती शिंदे यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व पटवून देत विविध आसनांचे सखोल मार्गदर्शन केले, तर कुमार आर्यन धावडे याने उपस्थितांसमोर योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली. मार्गदर्शन करताना सौ. शिंदे यांनी नमूद केले की, योग हा केवळ व्यायाम नसून शरीर, मन आणि आत्मा यांना जोडणारा प्राचीन भारतीय जीवनमार्ग आहे. नियमित योगासनांमुळे शरीराची ताकद व लवचिकता वाढते, ताणतणाव कमी होऊन एकाग्रता आणि स्मरणशक्ती सुधारते, तसेच रोगप्रतिकारक शक्ती आणि पचनक्रिया मजबूत होण्यास मोठी मदत होते. याच कार्यक्रमात डी.डी. शिंदे सरकार कॉलेजचे प्रा. डॉ. बृहस्पती शिंदे यांनी विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचनाची आवड कशी निर्माण करावी याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले, तर मुख्याध्यापिका श्रीम. गुरखे मॅडम यांनीही शिबीराच्या आयोजनाबाबत आपले मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मान. श्री. रामचंद्र वरेकर, सहसचिव मान. श्री. किशोर नारकर, निवृत्त उपअभियंता श्री. किरण गवळी, सामाजिक कार्यकर्ते श्री. अनंत धावडे, श्री. अभय धावडे, मुख्याध्यापिका श्रीम. गुरखे मॅडम आणि पर्यवेक्षिका श्रीम. गांधी मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. राजाध्यक्ष सर यांनी केले तर श्री. भोळे सर यांनी आभार मानले. शिबीराच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

- Advertisement -
Total Visitors :
4750451
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *