चिपळूण: निवळीतील पशुवैद्यकीय दवाखान्याचा रखडलेला प्रश्न मार्गी लागणार; अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पाहणी

Gramin Varta
94 Views

चिपळूण : वहाळ जिल्हा परिषद गटातील निवळी येथील शेतकरी आणि पशुपालकांच्या जिव्हाळ्याचा असलेला पशुवैद्यकीय दवाखान्याचा रखडलेला प्रश्न आता मार्गी लागण्याच्या दिशेने हालचाली सुरू झाल्या आहेत. गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून दवाखान्याची जुनी इमारत जीर्ण व वापरास अयोग्य अवस्थेत असल्याने नवीन इमारतीची आवश्यकता निर्माण झाली आहे. याबाबत जिल्हा परिषद सदस्या सौ. शिवानी संदीप सावंत यांनी स्थायी समितीत विषय मांडून प्रशासनाचे लक्ष वेधले. त्याची तात्काळ दखल घेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी निवळी येथे प्रत्यक्ष पाहणी केली.

निवळी तसेच परिसरातील शेतकरी व पशुपालकांसाठी पशुवैद्यकीय दवाखाना ही अत्यावश्यक सुविधा असून पशुधनाच्या उपचारासाठी गावातच सेवा उपलब्ध होणे गरजेचे आहे. मात्र, सध्याची इमारत अनेक वर्षांपासून जीर्ण अवस्थेत असल्याने नवीन पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत उभारण्याच्या दृष्टीने पुढील कार्यवाही होणे आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दवाखाना इमारतीची प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ. शिवानी संदीप सावंत, सा.बा. विभागाचे उपअभियंता अविनाश जाधव, संदीपजी सावंत, उपसरपंच मनोज डीके, सुरेंद्रजी सुर्वे, निवळी विभाग प्रमुख महेश पिलवलकर, महेश डिके यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. जुन्या इमारतीचे निर्लेखन करून नवीन पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत तसेच कर्मचाऱ्यांच्या निवासाची व्यवस्था असलेल्या इमारतीसाठी आवश्यक प्रस्ताव व अंदाजपत्रक तयार करण्याच्या दृष्टीने पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना सौ. शिवानी सावंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

नवीन पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत उभारल्यास निवळी आणि परिसरातील शेतकरी व पशुपालकांना पशुधनाच्या उपचारासाठी अधिक चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नाला आता सकारात्मक दिशा मिळाली असून दवाखान्याचा रखडलेला प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.

Total Visitors :
4750429
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *