रत्नागिरी : शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत आता अधिक काटेकोरपणे नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. शालेय पोषण आहाराचा दर्जा, स्वच्छता आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळा व्यवस्थापन व मुख्याध्यापकांची जबाबदारी निश्चित करण्यात आली असून, संबंधित शाळांना भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाकडे (एफएसएसएआय) नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
शालेय विद्यार्थ्यांना दिला जाणारा पोषण आहार स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार असावा, यासाठी ही नोंदणी आवश्यक करण्यात आली आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील मध्यान्ह भोजन देणाऱ्या प्रत्येक शाळेला शिक्षक मित्र पोर्टलवर उपलब्ध माहितीनुसार अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत नोंदणी किंवा आवश्यक परवाना घेणे गरजेचे आहे.
शाळेच्या आवारात तसेच ५० मीटर परिसरात हाय फॅट, शुगर आणि सॉल्ट असलेल्या जंक फूडच्या विक्रीवर व जाहिरातींवरही निर्बंध घालण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करणाऱ्या खाद्यपदार्थांपासून त्यांना दूर ठेवण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
शालेय पोषण आहार पुरविणाऱ्या संस्था आणि बचतगटांनाही अन्न सुरक्षा कायद्यानुसार नोंदणी करणे अथवा आवश्यक परवाना घेणे बंधनकारक आहे. स्वयंपाक करणाऱ्या बचतगटातील सदस्य किंवा कर्मचाऱ्यांनी स्वच्छता पाळणे, शुद्ध पाण्याचा वापर करणे तसेच अन्न हाताळताना आवश्यक नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे.
विद्यार्थ्यांना मिळणारे जेवण स्वच्छ, दर्जेदार आणि पोषणमूल्यांनी युक्त असल्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीकडे देण्यात आली आहे. यासोबतच विद्यार्थ्यांना आणि पालकांना पौष्टिक आहार व आरोग्य सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
या निर्णयामुळे शालेय पोषण आहाराच्या गुणवत्तेत सुधारणा होऊन विद्यार्थ्यांना अधिक सुरक्षित आणि आरोग्यदायी आहार मिळण्यास मदत होणार आहे.
शालेय पोषण आहाराच्या दर्जाची जबाबदारी आता मुख्याध्यापकांवर
Leave a Comment





