गुहागर-चिपळूण सीमेवर अवघड वळणावर अवजड ट्रेलर अडकला; काही तास वाहतूक ठप्प

Gramin Varta
77 Views

गुहागर: गुहागर आणि चिपळूण तालुक्यांच्या सीमेवर असणाऱ्या केरे हद्दीत आज पहाटेच्या सुमारास अवजड वाहतूक करणारा ट्रेलर अडकल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. कापशी पुलाच्या वरील बाजूस सुमारे दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या एका तीव्र वळणावर हा अपघातसदृश प्रसंग घडला. सतत सुरू असलेला पाऊस आणि घाटातील अवघड चढणीमुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा भलामोठा ट्रेलर रस्त्याच्या मधोमध अडकून पडला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, अशोका कंपनीचा हा ट्रेलर गुहागर तालुक्यातील तवसाळ येथून स्टीलचे अवजड साहित्य घेऊन श्रीवर्धनच्या दिशेने जात होता. मात्र, केरे हद्दीतील तीव्र वळणावर चढ चढताना ट्रेलर रस्त्यावरच थांबला. परिणामी, दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. सकाळच्या सुमारास झालेल्या या कोंडीमुळे चाकरमानी, विद्यार्थी आणि प्रवाशांना काही तास ताटकळत राहावे लागले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर सावर्डे पोलीस ठाण्याचे पथक आणि आबलोली येथील पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने युद्धपातळीवर बचावकार्य हाती घेतले. क्रेन व इतर साहित्याचा वापर करून रस्त्यात अडकलेला हा ट्रेलर यशस्वीरीत्या बाजूला करण्यात आला. अथक प्रयत्नांनंतर काही तासांनी या मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली असून प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

- Advertisement -
Total Visitors :
4763939
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *