अतिउत्कृष्ट सेवा पदकप्राप्त पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांचा कोंडगे ग्रामस्थांतर्फे सन्मान

Gramin Varta
105 Views

लांजा/अरबाज नेवरेकर : लांजा पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे आणि हवालदार आशिष शेलार यांना भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या वतीने स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने अतिउत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाल्याबद्दल कोंडगे ग्रामस्थांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.

१५ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त या पदकाची घोषणा करण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या शुभहस्ते विशेष सन्मान झाल्याबद्दल कोंडगे ग्रामपंचायतीच्या वतीने पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे व हवालदार आशिष शेलार यांचा शाल, छत्रपती शिवाजी महाराजांचा ग्रंथ आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

निर्मल ग्रामपंचायत कोंडगेचे सरपंच डॉ. एस. व्ही. कदम, महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष स्वप्नील विश्वनाथ जाधव तसेच ग्राम सुरक्षा समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष विजय मुरलीधर कदम यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला.

लांजा पोलीस ठाण्यात झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमात कोंडगे गावाच्या वतीने मिळालेल्या सन्मानाबद्दल पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी ग्रामस्थांचे आभार मानले. कोंडगे गावातील समस्या सोडविण्यासाठी तसेच गावाच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासनाकडून यापुढेही आवश्यक ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

दरम्यान, कोंडगे गावातील अवैध दारूधंद्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न करण्यात आले आहेत. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अमोद सरंगळे यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या कार्याची दखल घेत ग्रामस्थांच्या वतीने अमोद सरंगळे यांचाही शाल, छत्रपती शिवाजी महाराजांचा ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमातून ग्रामस्थ आणि पोलीस प्रशासन यांच्यातील परस्पर सहकार्य व समन्वयाची भावना अधिक दृढ झाली.

Total Visitors :
4763687
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *