लोटे एमआयडीसीतील कोकाकोला कंपनीच्या सांडपाण्याचा प्रश्न ऐरणीवर; ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

Gramin Varta
133 Views

खेड : लोटे अतिरिक्त औद्योगिक वसाहतीतील कोकाकोला कंपनीकडून दुर्गंधीयुक्त सांडपाणी उघड्यावर सोडले जात असल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी निदर्शनास आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. या सांडपाण्यामुळे परिसरातील शेती, नाले तसेच पर्यावरणावर विपरीत परिणाम होत असून, सुमारे चार ते पाच हजार लोकवस्तीच्या नैसर्गिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांनाही धोका निर्माण झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, कंपनी परिसरातून वेळोवेळी दुर्गंधीयुक्त सांडपाणी बाहेर सोडले जात असल्याने नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. सांडपाणी नैसर्गिक जलस्रोतांच्या परिसरात पोहोचल्यास भविष्यात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची भीतीही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर या पाण्याचा शेतीवर परिणाम होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.

या प्रकरणाबाबत एमआयडीसी प्रशासन तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे यापूर्वी वारंवार तक्रारी करण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. मात्र, संबंधित यंत्रणांकडून अपेक्षित गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे प्रशासनाने केवळ कागदोपत्री कारवाई न करता प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करून सांडपाण्याचा स्रोत, त्याची विल्हेवाट आणि त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी पुढे आली आहे.

दरम्यान, सांडपाणी उघड्यावर सोडण्याचा प्रकार तातडीने थांबवून संबंधित यंत्रणांनी योग्य ती कार्यवाही केली नाही, तर ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांच्या आरोग्याशी तसेच पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांशी संबंधित हा प्रश्न असल्याने प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी आणि दोष आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

यावेळी माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष असगणी अशोक धाडवे आणि असगणी शिवसेना शाखाप्रमुख इस्माईल कादरी यांनी ग्रामस्थांची भूमिका मांडत संबंधित प्रशासनाने तातडीने पाहणी करून योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली.

Total Visitors :
4771230
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *