चिपळूण : रक्कम दामदुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी ‘मातृभूमी ग्रुप ऑफ कंपनी’च्या संचालकाला रविवारी चिपळूण पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
प्रदीप रवींद्र गर्ग असे अटक करण्यात आलेल्या संचालकाचे नाव आहे. प्रदीप गर्ग याने राज्यभरातील अनेक जिल्ह्यांत नागरिकांना रक्कम दामदुप्पट करून देण्याचे आमिष दाखवले होते. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. चिपळूणमध्ये त्याने २०२९ रोजी ‘मातृभूमी ग्रुप ऑफ कंपनी’च्या माध्यमातून अनेकांची फसवणूक केली होती. त्यानंतर गुन्हा दाखल होऊन अटकही झाली होती.
चिपळूण न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली होती. मात्र, तो जामीन आदेशातील अटी-शर्तीचे पालन करत नव्हता तसेच न्यायालयासमोर हजरही होत नव्हता. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने त्याचा जामीन रद्द करून अजामिनपात्र वॉरंट बजावण्याचे आदेश दिले. तो फरार झाल्याने पोलिसांना सापडत नव्हता. शेवटी मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने त्याला उत्तर प्रदेशातून अटक केली. रविवारी त्याला चिपळूण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानुसार न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्याला १२ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.
चिपळूण : दामदुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या कंपनी संचालकास न्यायालयीन कोठडी
