रत्नागिरीच्या गोळपमधील आई-वडिलांचा विद्यानंद बापटांना ठाम पाठिंबा; ‘काळजी घे, सांभाळून राहा, आम्ही तुझ्या पाठीशी’

Gramin Varta
221 Views

रत्नागिरी : गणेशोत्सवातील डीजेचा वाढता वापर आणि रस्त्यावरील मंडपांमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाविरोधात भूमिका घेणाऱ्या विद्यानंद बापट यांना त्यांच्या रत्नागिरीतील आई-वडिलांनी ठाम पाठिंबा दिला आहे. पुण्यात गुरुवारी (३ सप्टेंबर) विद्यानंद यांना एका व्यक्तीने मारहाण केल्याच्या घटनेनंतर त्यांच्या आई-वडिलांनी तीव्र निषेध व्यक्त केला. मुलाच्या भूमिकेला पूर्ण पाठिंबा देतानाच, ‘काळजी घे, सांभाळून राहा; आम्ही नेहमीच तुझ्या पाठीशी आहोत,’ असा धीर त्यांनी दिला आहे.

विद्यानंद बापट सध्या पुण्यात स्थायिक असून त्यांचे मूळ गाव रत्नागिरी तालुक्यातील गोळप आहे. त्यांचे वडील सुहास बापट आणि आई कल्पना बापट हे गोळप येथे राहतात. गणेशोत्सवात डीजेचा होणारा वापर तसेच रस्त्यांवर उभारण्यात येणाऱ्या मंडपांमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाविरोधात विद्यानंद यांनी भूमिका घेतली आहे. याच भूमिकेमुळे गुरुवारी पुण्यात त्यांच्यावर मारहाणीचा प्रकार घडला.

या घटनेनंतर विद्यानंद यांचे वडील सुहास बापट यांनी मुलाच्या भूमिकेचे समर्थन केले. ते म्हणाले की, विद्यानंद यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे आणि त्याला कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा आहे. विचाराने मांडलेला प्रश्न विचारानेच सोडवायला हवा. त्यासाठी मारहाण करणे हा प्रकार निषेधार्ह आहे. मात्र, भूमिका योग्य असल्याने विद्यानंद यांनी आपला मार्ग सोडू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मारहाणीच्या घटनेनंतर विद्यानंद यांच्याशी फोनवरून संपर्क झाला. ‘मी बरा आहे,’ असे त्याने सांगितल्यानंतर मोठा दिलासा मिळाला, असे सुहास बापट यांनी सांगितले. मुलगा पुण्यात, तर आपण रत्नागिरीतील गोळप येथे असल्याने घटनास्थळी तातडीने पोहोचता येत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

आई कल्पना बापट यांनीही मुलाच्या भूमिकेला ठाम पाठिंबा देताना त्याच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली. मारहाण झाल्यानंतर फोनवर विद्यानंदशी बोलणे झाले. तो सुखरूप असल्याचे समजल्यानंतर दिलासा मिळाला. मात्र, गोळप येथून पुणे दूर असल्याने लगेच त्याच्यापर्यंत पोहोचणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे विद्यानंद यांनी काळजी घ्यावी, सांभाळून राहावे, असे सांगितल्याचे त्या म्हणाल्या. तसेच पोलिसांनी विद्यानंद यांना संरक्षण द्यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

मुलावर झालेल्या हल्ल्यामुळे आई-वडिलांची चिंता वाढली असली तरी ध्वनी प्रदूषणाविरोधात विद्यानंद यांनी घेतलेली भूमिका योग्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मुलाच्या भूमिकेला विरोध करणाऱ्या दबावापेक्षा त्याच्या सुरक्षिततेची चिंता अधिक असली, तरी त्याच्या सामाजिक भूमिकेपासून मागे हटणार नसल्याचा ठाम संदेश रत्नागिरीतील गोळप येथील बापट कुटुंबीयांनी दिला आहे.

Total Visitors :
4803767
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *