रत्नागिरी: आरे येथे मांजर हरवल्याच्या वादातून दोन गटांत हाणामारी; परस्पर गुन्हे दाखल

Gramin Varta
340 Views

रत्नागिरी : मांजर हरवल्याच्या कारणावरून सुरू झालेल्या शाब्दिक वादाचे पर्यवसान दोन गटांमध्ये जोरदार हाणामारीत झाल्याची घटना रत्नागिरी तालुक्यातील आरे येथे ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात दोन्ही गटांकडून परस्पर तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, पोलिसांनी संबंधितांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रसाद प्रकाश कदम हे पत्नी सी. पूर्वा कदम यांच्यासोबत घराबाहेर रस्त्यावर मांजर हरवल्याबाबत चर्चा करत होते. त्यावेळी शेजारी राहणाऱ्या दिपाली कदम यांनी त्यांचे बोलणे ऐकून फिर्यादी व त्यांच्या पत्नीला शिवीगाळ करत मांजराबाबत विचारणा केली. त्यानंतर घरातून अन्य व्यक्ती बाहेर येऊन वाद वाढल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

यानंतर कदम कुटुंबीय तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्याकडे जात असताना कदमवाडी चव्हाट्याजवळ पुन्हा वाद झाला. पाखाडीची साफसफाई करत असलेल्या कामगाराचा धक्का प्रसाद कदम यांच्या पत्नीला लागल्याने विचारणा करण्यात आली. त्यानंतर वाद वाढून मारामारी झाल्याचा आरोप आहे. प्रसाद कदम यांच्यावर कटरच्या ब्लेडने ओरबाडून मारहाण करण्यात आली, तर जमावाने त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दगड व काठीनेही मारहाण झाल्याचा आरोप असून, या घटनेत प्रसाद कदम, त्यांची पत्नी पूर्वा, भाऊ पंकज आणि अन्य एक महिला जखमी झाल्याचे पोलिस नोंदीत नमूद आहे.

या प्रकरणी प्रसाद प्रकाश कदम यांच्या फिर्यादीवरून दिपाली दिलीप कदम, विदेश भालचंद्र कदम, मयरेश पांडुरंग आरेकर, संदेश मधुकर कदम, आदेश भालचंद्र कदम, सुष्मा मधुकर कदम, साक्षी सुरेश कदम, पल्लवी आदेश कदम, अस्मिता आनंद पेडणेकर, अपेक्षा कदम, साहिल राम, सागर राम शिवलकर यांच्यासह अन्य व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम १८९(२)(४), १९०, १९१(२), ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या घटनेला प्रत्युत्तर म्हणून अस्मिता आनंद पेडणेकर यांनीही पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. दळण आणण्यासाठी जात असताना कालभैरव मंदिराजवळ मोठ्याने आरडाओरड ऐकून त्या घटनास्थळी गेल्या. तेथे दोन गटांमध्ये भांडण सुरू असल्याचे दिसल्याने त्या भांडण सोडवण्यासाठी मध्ये गेल्या असता प्रसाद कदम व पंकज कदम यांनी छातीवर व हातावर मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच डोक्यावर वस्तूने मारहाण करण्यात आली, तर अन्य आरोपीने काठीने मारहाण करून धमकी दिल्याचे त्यांच्या तक्रारीत नमूद आहे.

या तक्रारीवरून प्रसाद कदम, पंकज कदम, दुर्वाक कदम आणि रक्षंदा पंकज कदम यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५२ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गटांकडून परस्पर गुन्हे दाखल झाल्याने आरे परिसरातील या घटनेने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी ग्रामीण पोलिसांकडून सुरू आहे.

Total Visitors :
4820625
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *