CSMT-सावंतवाडी एक्स्प्रेसचा प्रवास सर्वाधिक वेळखाऊ; मुंबई-सावंतवाडी मार्गावरील अन्य गाड्यांपेक्षा अधिक वेळ

Gramin Varta
278 Views

रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोडदरम्यान नव्याने सुरू करण्यात आलेल्या दैनिक एक्स्प्रेसमुळे कोकणातील प्रवाशांना मुंबई-सावंतवाडी प्रवासासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध झाला असला, तरी उपलब्ध वेळापत्रकानुसार ही गाडी या मार्गावरील अन्य प्रमुख दैनिक गाड्यांच्या तुलनेत सर्वाधिक वेळ घेणारी ठरणार आहे. सुमारे ५१० किलोमीटरचा प्रवास पूर्ण करण्यासाठी नव्या गाडीला तब्बल १४ तास २० मिनिटे लागणार असल्याने तिच्या प्रवासाच्या वेळेवरून प्रवाशांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.

रेल्वे मंत्रालयाच्या अधिकृत माहितीनुसार, १५०८७ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सावंतवाडी रोड एक्स्प्रेस रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी २ वाजून १५ मिनिटांनी सावंतवाडी रोड येथे पोहोचणार आहे. त्यामुळे मुंबई ते सावंतवाडी हा प्रवास १४ तास २० मिनिटांचा होणार आहे. परतीच्या प्रवासात १५०८८ सावंतवाडी रोड-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस सायंकाळी ५ वाजून २० मिनिटांनी सावंतवाडीहून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी मुंबईत पोहोचेल. या प्रवासाला १३ तास २० मिनिटे लागणार आहेत.

सध्या लागू असलेल्या पावसाळी वेळापत्रकातील मुंबई-सावंतवाडी मार्गावरील अन्य दैनिक गाड्यांशी तुलना केली असता नव्या एक्स्प्रेसचा प्रवास अधिक लांब आहे. दादरहून धावणारी तुतारी एक्स्प्रेस सावंतवाडीपर्यंत १२ तास ४५ मिनिटांत पोहोचते, तर दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेसला १२ तास २० मिनिटे लागतात. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून धावणारी मांडवी एक्स्प्रेस ११ तास ५० मिनिटांत सावंतवाडी गाठते. कोकणकन्या एक्स्प्रेसचा प्रवास ९ तास ४४ मिनिटांचा, जनशताब्दी एक्स्प्रेसचा ९ तास ३२ मिनिटांचा, तर मंगळुरू एक्स्प्रेसचा प्रवास अवघ्या ९ तास ८ मिनिटांचा आहे. त्यामुळे नव्या एक्स्प्रेसचा प्रवास दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेसपेक्षाही सुमारे दोन तासांनी अधिक आहे.

परतीच्या प्रवासातही हीच स्थिती दिसून येत आहे. १५०८८ एक्स्प्रेसला सावंतवाडी रोड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या प्रवासासाठी १३ तास २० मिनिटे लागणार आहेत. तुलनेत तुतारी एक्स्प्रेस १२ तास ४५ मिनिटांत मुंबई गाठते. मांडवी एक्स्प्रेसला ११ तास ४१ मिनिटे, सावंतवाडी-दिवा एक्स्प्रेसला ११ तास ३० मिनिटे, मंगळुरू एक्स्प्रेसला १० तास ३६ मिनिटे, जनशताब्दीला १० तास २८ मिनिटे, तर कोकणकन्या एक्स्प्रेसला १० तास ८ मिनिटे लागतात. त्यामुळे परतीच्या प्रवासातही १५०८८ ही तुलनेने सर्वाधिक वेळ घेणारी दैनिक गाडी ठरणार आहे. तुतारी एक्स्प्रेसच्या तुलनेत तिचा प्रवास ३५ मिनिटांनी, तर कोकणकन्येच्या तुलनेत तब्बल ३ तास १२ मिनिटांनी अधिक आहे.

दरम्यान, या नव्या गाडीच्या नियमित सेवेच्या प्रारंभाबाबत आणि आरक्षणाच्या उपलब्धतेबाबत अद्याप काही प्रमाणात अस्पष्टता कायम आहे. या गाडीची उद्घाटन विशेष फेरी ३ सप्टेंबर रोजी ०१००१ या क्रमांकाने चालवण्यात आली होती. कोकण रेल्वेच्या माहितीनुसार ही विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी रात्री २ वाजता सावंतवाडी रोडला पोहोचली. मात्र १५०८७ आणि १५०८८ या नियमित दैनिक सेवांचा नेमका प्रारंभ कोणत्या तारखेपासून होणार, याबाबत प्रसिद्ध माहितीत स्पष्ट उल्लेख नसल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम आहे. नियमित आरक्षण कधी सुरू होणार आणि जाहीर केलेल्या वेळापत्रकात भविष्यात बदल होणार का, याबाबत रेल्वे प्रशासनाकडून स्पष्टता अपेक्षित आहे.

नव्या दैनिक एक्स्प्रेसमुळे मुंबई आणि कोकणादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अतिरिक्त रेल्वेसेवा तसेच विविध स्थानकांसाठी थेट प्रवासाचा पर्याय मिळणार आहे. विशेषतः तिकीट उपलब्धतेच्या दृष्टीने ही सेवा प्रवाशांसाठी उपयुक्त ठरू शकते. मात्र उपलब्ध वेळापत्रकानुसार प्रवासाच्या कालावधीचा विचार केला, तर मुंबई-सावंतवाडी मार्गावरील अन्य प्रमुख दैनिक गाड्यांच्या तुलनेत या नव्या एक्स्प्रेसचा प्रवास अधिक वेळखाऊ ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Total Visitors :
4820397
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *