गुहागरात मारुती इको कारची दुचाकीला जोरदार धडक; अपघातात प्रौढाचा मृत्यू

saurabhsalvi26
324 Views

गुहागर: गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर गुहागर दिवाणी न्यायालयासमोर कार आणि दुचाकी दरम्यान झालेल्या एका भीषण अपघातामध्ये ४७ वर्षीय प्रौढाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात रविवारी सायंकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास घडला असून, संजय वसंत कानसरे (वय ४७, राहणार गुहागर, वरचापाट सांगळेवाडी) असे मृताचे नाव आहे. परिसरात एक प्रसिद्ध पेंटर म्हणून त्यांची मोठी ओळख होती. रविवारी सायंकाळी ते आपल्या दुचाकीने मोडकाघर येथून गुहागरच्या दिशेने येत होते. याच दरम्यान गुहागरहून शृंगारतळीकडे जात असलेल्या मारुती इको कारला त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक बसली. या अपघातात संजय कानसरे यांना अत्यंत गंभीर दुखापत झाली होती.


अपघातानंतर जबर जखमी झालेल्या कानसरे यांना तातडीने उपचारासाठी कामथे येथील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात येत होते, मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेत त्यांची प्राणज्योत मालवली. कामथे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेनंतर सोमवारी गुहागर येथील चैतन्यभूमी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अकस्मात जाण्याने सांगळेवाडी परिसरावर मोठी शोककळा पसरली असून, त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले आणि दोन भाऊ असा मोठा आप्तपरिवार आहे.

Total Visitors :
4820519
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *