पावसासाठी चिपळूणमध्ये हजारो मुस्लिम बांधवांची विशेष नमाज; अल्लाहकडे साकडे

Gramin Varta
40 Views

चिपळूण: संपूर्ण राज्यासह कोकणातही पावसाने दडी मारल्याने तीव्र पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर, वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी चिपळूण येथील उक्ताड बायपास रोडवरील इजतिमा मैदानात हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्र येत पावसासाठी विशेष नमाज अदा केली. मुफ्ती साबीर डांगे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या विशेष नमाजनंतर सामूहिक प्रार्थना करून लवकरात लवकर पाऊस पडावा आणि जनजीवनाला दिलासा मिळावा यासाठी अल्लाहकडे साकडे घालण्यात आले. पावसाच्या विलंबामुळे मानवासह संपूर्ण सजीव सृष्टीला होत असलेला त्रास दूर व्हावा, सर्वांना या कठीण परिस्थितीचा सामना करण्याची ताकद मिळावी आणि मानवाकडून झालेल्या चुकांची क्षमा करून निसर्गाचे चक्र पूर्ववत व्हावे, अशी आर्त हाक या वेळी उपस्थित हजारो बांधवांनी सामूहिक प्रार्थनेतून दिली.

या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मौलाना सादिक मेस्त्री यांनी पवित्र कुराण आणि हदीस शरीफमधील दाखले देत पाण्याचे महत्त्व अत्यंत प्रभावीपणे मांडले. इस्लाम धर्मात पाण्याचा काटकसरीने वापर करण्यावर कसा भर दिला आहे, हे सांगताना त्यांनी पैगंबर हजरत मुहम्मद (स.अ.व.) यांच्या संदेशाचा हवाला दिला. वाहत्या पाण्यात वजू करतानाही मर्यादितच पाणी वापरावे असा नियम असून, पाण्याचा अपव्यय टाळणे ही प्रत्येक नागरिकाची नैतिक आणि सामाजिक जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत त्यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित केले. एक झाड लावून ते जगविल्यास, त्याचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक सजीवाच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीला सतत पुण्य (सदाका-ए-जारिया) मिळत राहते, असे सांगत त्यांनी प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संवर्धन करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले. या विशेष नमाज आणि सामूहिक प्रार्थनेसाठी चिपळूण शहर व परिसरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Total Visitors :
4576508
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *