रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर भीषण अपघात; ट्रेलरच्या धडकेत कार एकाच कुटुंबातील चौघे गंभीर जखमी

Gramin Varta
500 Views

पाली (वार्ताहर): रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर १६ जून रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत. खानू गावच्या हद्दीत पटेल सॉमिलजवळ रत्नागिरी ते करंजारीकडे जात असताना ट्रेलर आणि कारची समोरासमोर धडक झाली. यामध्ये कारचे मोठे नुकसान झाले असून महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

पाली पोलीस दूरक्षेत्रातून मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेलर चालक कांतीलाल सासिया मिना (रा. राजस्थान, सध्या रा. देवळेफाटा, संगमेश्वर) याने रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता, कोणतीही पूर्वसूचना किंवा सिग्नल न देता ट्रेलर हलगर्जीपणे मागे घेतला. याच वेळी मागून येणाऱ्या ओमनी कारला (एमएच ०७ एच ००२१) ट्रेलरने जोरदार धडक दिली. या अपघातात शोएब अख्तर मजीमुल्ला खान (वय २४), मजीमुल्ला खान, जिक्रुनिसा मजीमुल्ला खान (वय ४५) आणि सानिया मजीमुल्ला खान (वय १६, सर्व रा. करंजारी) हे जखमी होऊन वाहनात अडकून पडले होते.

स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना वाहनातून बाहेर काढले आणि पाली ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी रत्नागिरी येथे हलवण्यात आले आहे. शोएब अख्तर मजीमुल्ला खान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाली पोलीस दूरक्षेत्रात अपघाताची नोंद करण्यात आली असून, महिला हेड कॉन्स्टेबल तृप्ती सावंतदेसाई या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Total Visitors :
4576507
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *