भोस्ते घाटात दुचाकीसमोर माकड आल्याने अपघात; दोघे जखमी

Gramin Varta
240 Views

खेड: मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाट येथे दुचाकीसमोर अचानक माकड आल्याने झालेल्या एका विचित्र अपघातात महाड येथील दोघेजण जखमी झाले आहेत. ही घटना १७ जून रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास घडली. लोठे एमआयडीसी येथून महाडच्या दिशेने जाणारी एमएच-०६ बीजे-८३४७ क्रमांकाची दुचाकी भोस्ते घाट परिसरातून जात असताना अचानक एक माकड समोर आले. यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी थेट रस्त्यावर घसरली. या अपघातात महाड येथील नागरवाडी परिसरातील इरफान अब्दुल लतीफ खान (वय ४२) आणि धर्मेंद्र फंकेश सरसिंग (वय ५४) हे दोघे गंभीर जखमी झाले.

या अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी संस्थान, नाणीज धाम यांच्या २४ तास विनामूल्य रुग्णवाहिका सेवेचे चालक सुरज हंबीर हे तात्काळ रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कोणतीही वेळ न गमावता जखमींना त्वरित भरणे येथील धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून सध्या जखमींवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घाट परिसरात वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याने महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी अधिक सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Total Visitors :
4576817
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *