रत्नागिरीतील आंबा बागायतदार आक्रमक; नुकसानीचा अहवाल सरकारला तात्काळ पाठवण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Gramin Varta
219 Views

रत्नागिरी: हवामानातील तीव्र बदलांमुळे यंदा आंबा पिकाचे अतोनात नुकसान झाले असून, हवालदील झालेल्या बागायतदारांनी आता प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. अवकाळी पाऊस आणि अनियमित थंडीमुळे यंदा आंब्याला अपेक्षित मोहरच आला नाही, तर त्यानंतर वाढलेल्या प्रचंड तापमानामुळे तब्बल ८० टक्के मोहर काळा पडून गळून गेला. यामुळे यंदाचे ८० टक्के आंबा पीक बागायतदारांच्या हातून पूर्णपणे निसटून गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन आंबा बागायतदारांच्या नुकसानीचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल प्रशासनाने तातडीने राज्य सरकारला सादर करावा, अशी आग्रही मागणी कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्था, रत्नागिरी जिल्हा आंबा उत्पादक सहकारी संस्था, पावस परिसर आंबा उत्पादक संस्था, आडिवरे मंगलमूर्ती संघ आणि करबुडे रवळनाथ संघ यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

बागायतदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या या निवेदनात २०१५ पासून सातत्याने होत असलेल्या आर्थिक नुकसानीकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली कर्जमाफी आंबा उत्पादकांना त्वरित देण्यात यावी आणि २०१५ पासून ज्या नियमित कर्ज भरणार्या शेतकऱ्यांनी बँकांचे पैसे चुकते केले आहेत, त्यांनाही या कर्जमाफीचा थेट लाभ मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे. कर्जमाफी जाहीर करताना सरकारने शेतकऱ्यांची कोणतीही थट्टा करू नये, तसेच बागायतदारांना दिलासा देण्यासाठी हेक्टरी पाच लाख रुपये नुकसानभरपाई मंजूर करावी, असेही या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात हे निवेदन सादर करताना ज्येष्ठ बागायतदार प्रकाश साळवी यांच्यासह जिल्ह्यातील अनेक प्रमुख शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Total Visitors :
4576810
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *