स्कॉन उद्योग समूहाच्या सामाजिक उपक्रमातून १५० दिव्यांगांना मिळाले नवजीवन; अत्याधुनिक कृत्रिम हात-पायांचे मोफत वाटप

Gramin Varta
68 Views

रत्नागिरी : स्कॉन उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष निलेश चव्हाण यांच्या प्रेरणेतून रत्नागिरीत आयोजित करण्यात आलेल्या विशेष शिबिरात १५० दिव्यांग बांधवांना अत्याधुनिक कृत्रिम हात आणि पाय मोफत प्रदान करण्यात आले. श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालयात पार पडलेल्या या वितरण सोहळ्यात दिव्यांग व्यक्तींच्या चेहऱ्यावर नवा आत्मविश्वास आणि आनंदाचे क्षण पाहायला मिळाले. स्कॉन प्रो फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ स्कॉन प्रो आणि शं. ना. चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने व भारत विकास परिषद दिव्यांग केंद्राच्या सहकार्याने हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. गेल्या महिन्यात घेण्यात आलेल्या मोजमाप शिबिराची फलश्रुती म्हणून या लाभार्थ्यांना हे साहित्य देण्यात आले.

या उपक्रमाद्वारे ५० हजार रुपयांहून अधिक किमतीचे अत्याधुनिक कृत्रिम पाय आणि २० हजार रुपयांहून अधिक किमतीचे कृत्रिम हात गरजू लाभार्थ्यांना मोफत देण्यात आले. शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात स्कॉन समूह सातत्याने कार्यरत असून, ही सामाजिक बांधिलकी जपताना दिव्यांगांना स्वावलंबी बनवण्याचा मानस निलेश चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमाचे नेतृत्व करणारे निनाद चव्हाण यांनी स्कॉन समूहाच्या या सामाजिक प्रवासात सदैव सहकार्य करण्याची ग्वाही दिली. ‘सेवा हीच समाजप्रतिबद्धता’ हे ब्रीदवाक्य समोर ठेवून राबवलेल्या या मोहिमेमुळे दिव्यांग बांधवांच्या आयुष्यात स्वावलंबनाचा नवा प्रकाश निर्माण झाला आहे.

Total Visitors :
4577002
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *