कशेडी घाटात दरड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्ग ठप्प; वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे हाल

Gramin Varta
432 Views

खेड: रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या कशेडी घाटात सोमवारी पहाटे १.३० वाजण्याच्या सुमारास दरड कोसळल्याची मोठी घटना घडली. हॉटेल अनुसयापासून सुमारे १०० मीटर अंतरावर दरडीचा ढिगारा रस्त्यावर आल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. गेल्या आठ तासांपासून वाहतूक ठप्प असल्याने महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असून, यामुळे माती खचून ही दरड कोसळल्याचे प्राथमिक निरीक्षण प्रशासनाने नोंदवले आहे.

दरडीचा आकार मोठा असल्याने महामार्गावरून ये-जा करणे धोकादायक झाले आहे, त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि स्थानिक पोलीस प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे. जेसीबी आणि अन्य यंत्रसामग्रीच्या साहाय्याने दरड हटवण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे, जेणेकरून वाहतूक लवकरात लवकर पूर्ववत करता येईल. मात्र, घाट परिसरात अद्यापही पावसाचा जोर कायम असल्याने दरड कोसळण्याचा धोका अजूनही टळलेला नाही. सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने वाहनचालकांना आवाहन केले असून, अत्यावश्यक काम असल्याशिवाय या मार्गावरून प्रवास टाळावा आणि वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Total Visitors :
4576508
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *