वडापाव आणण्यासाठी गेलेल्या बालिकेशी हॉटेल चालकाचे गैरवर्तन, दापोलीत खळबळ

Gramin Varta
547 Views

दापोली : तालुक्यातील वळणे एमआयडीसी परिसरातील एका हॉटेलमध्ये वडापाव आणण्यासाठी गेलेल्या ७ वर्षीय बालिकेशी कथित गैरवर्तन केल्याप्रकरणी हॉटेल चालकाविरोधात दापोली पोलीस ठाण्यात पोक्सो कायदा तसेच भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार, ७ जुलै रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास ७ वर्षीय बालिका तिच्या १२ वर्षीय भावासोबत वळणे एमआयडीसी परिसरातील एका हॉटेलमध्ये वडापाव घेण्यासाठी गेली होती. त्यावेळी हॉटेल चालक किशोर भगवान पटेल (वय ५०) याने मुलीच्या भावाला काही कारण सांगून बाहेर पाठवले. त्यानंतर बालिकेला हॉटेलच्या स्वयंपाकघरात नेऊन तिच्याशी कथित गैरवर्तन केल्याचा आरोप आहे.

घरी परतल्यानंतर बालिकेने घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीच्या आधारे किशोर भगवान पटेल याच्याविरोधात पोक्सो कायद्यासह भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पूजा हिरेमठ करीत आहेत.

Total Visitors :
4827513
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *