दापोलीत अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमुळे संतापाचा भडका; दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी

Gramin Varta
65 Views

दापोली: दापोली तालुक्यात गेल्या चार दिवसांत, म्हणजेच ४ ते ७ जुलै २०२६ दरम्यान पोक्सो कायद्यांतर्गत तीन गंभीर गुन्हे घडल्याने संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या दापोली तालुक्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना घडणे ही अत्यंत धक्कादायक आणि लाजिरवाणी बाब असल्याचे मत व्यक्त करत, निवेदिता प्रतिष्ठान आणि समस्त दापोलीकरांच्या वतीने १० जुलै रोजी तहसीलदार दापोली यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात प्रामुख्याने अल्पवयीन मुलीला मातृत्वास भाग पाडणाऱ्या नराधमासह सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे.

याव्यतिरिक्त, डिसेंबर २०२५ मध्ये एका दिव्यांग युवतीवर ७२ वर्षांच्या वृद्धाने केलेल्या अत्याचाराच्या प्रकरणातील आरोपीलाही फाशीची शिक्षा व्हावी आणि पीडित युवतीला शासनाच्या ‘मनोधैर्य’ योजनेचा लाभ तातडीने मिळावा, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. अत्याचाराच्या या घटनांमधील दोषींना केवळ कायदेशीर शिक्षाच नाही, तर नागरिकांसमोर आणि माता-भगिनींसमोर चाबकाचे फटके मारण्यात यावेत, असा संतप्त सूर निवेदनातून उमटला. निवेदन स्वीकारताना तहसीलदारांनीही तालुक्यात घडलेल्या या सलग घटनांबाबत तीव्र खंत व्यक्त केली आणि शासनाकडे या मागण्या पोहोचवून नियमानुसार कडक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

याप्रसंगी निवेदिता प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रशांत परांजपे, समन्वयक प्रा. डॉ. स्कंधा खेडेकर, दापोली तालुका व्यापारी संघटनेचे सचिव मिलिंद शेठ, प्रा. कुणाल मंडलिक, डॉ. आनंद दांडेकर, मुग्धा सरदेसाई, श्रद्धा दांडेकर, वैष्णवी भागवत, नेहल पवार यांच्यासह तालुक्यातील बहुसंख्य नागरिक आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. दापोलीतील या विकृत प्रवृत्तींना कायमची जरब बसावी, यासाठी प्रशासनाने आता कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी सर्व स्तरांतून केली जात आहे.

- Advertisement -
Total Visitors :
4827846
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *