टेरवमध्ये बंद पडलेल्या बीएसएनएल टॉवरचा प्रश्न गंभीर; जुना टॉवर हटवून नवीन टॉवर उभारण्याची ग्रामस्थांची मागणी

Gramin Varta
245 Views

चिपळूण: चिपळूण तालुक्यातील टेरव गावातील अनेक महिन्यांपासून बंद पडलेल्या बीएसएनएल मोबाईल टॉवरमुळे ग्रामस्थांचे हाल होत असून, हा जुना व निरुपयोगी टॉवर तात्काळ हटवून त्याजागी अत्याधुनिक 4G/5G तंत्रज्ञानाचा नवीन टॉवर उभारावा, अशी मागणी टेरव ग्रामपंचायतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. सरपंच किशोर कदम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या मागणीनुसार, बीएसएनएल टॉवर बंद असल्याने गावातील संपूर्ण मोबाईल नेटवर्क सेवा ठप्प झाली आहे.

याचा फटका विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणाला बसत असून, शासकीय अर्ज आणि विविध डिजिटल सेवाही बाधित झाल्या आहेत. व्यापारी, महिला आणि चाकरमान्यांनाही नेटवर्कअभावी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, रिचार्ज करूनही सेवा मिळत नसल्याने नागरिकांचे आर्थिक नुकसान होत आहे. विशेष म्हणजे, अतिवृष्टी किंवा नैसर्गिक आपत्तीच्या काळात गावाचा बाह्य जगाशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. जुना टॉवर कोणत्याही उपयोगाचा नसल्याने तो हटवून नवीन तंत्रज्ञानाचा टॉवर उभारणे काळाची गरज असल्याचे ग्रामपंचायतीने स्पष्ट केले आहे. प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घेऊन सकारात्मक निर्णय न घेतल्यास, महिला, विद्यार्थी व ग्रामस्थ विद्यमान टॉवरच्या ठिकाणी लोकशाही मार्गाने जनआंदोलन छेडतील, असा इशारा सरपंच किशोर कदम यांनी दिला आहे.

Total Visitors :
4576953
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *