राजापूर: डॉक्टरकडे खंडणी उकळणाऱ्या लांजातील दोघांना पोलिसांकडून अटक

Gramin Varta
663 Views

राजापूर : तालुक्यातील वडदहसोळ येथील एका डॉक्टरांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून २५ हजार रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी राजापूर पोलिसांनी लांजातील दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. सिद्धेश जयंत आंग्रे (वय ३१, रा. सडवली मावळतवाडी, ता. लांजा) आणि सोहम गंगाराम विर्हाडी (वय २०, रा. खांचलवाडी गोळवशी, ता. लांजा) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणातील डॉक्टरने राजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती, त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

तक्रारदार डॉक्टरच्या मोबाइलमधील इन्स्टाग्राम आयडीचा वापर करून संशयित आंग्रे याने संबंधित डॉक्टरांना काही फोटो पाठवून ब्लॅकमेल केले होते. यातूनच त्यांनी डॉक्टरांकडे एकूण २ लाख २५ हजार रुपयांची खंडणी मागितली होती, ज्यापैकी २५ हजार रुपये गुगल पेद्वारे उकळण्यात आले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी दोन्ही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, उकळलेले २५ हजार रुपये डॉक्टरला परत मिळवून देण्याची कार्यवाही पोलीस करत आहेत.

Total Visitors :
4820459
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *