राजापूर: घरघंटी योजनेच्या नावाखाली महिलेची १२ हजारांची फसवणूक

Gramin Varta
289 Views

राजापूर : तालुक्यात शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची १२ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पीडित महिला आणि तिच्या कुटुंबियांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला असून परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेने पंचायत समितीकडे घरघंटीसाठी अधिकृत अर्ज केला होता. त्यानंतर अवघ्या १५ दिवसांत एक अनोळखी व्यक्ती घरघंटी घेऊन महिलेच्या घरी हजर झाली. आपण लांजावरून आलो असल्याचे सांगून त्या व्यक्तीने महिलेला भूलथापा दिल्या आणि “काही दिवसांत शासनाचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील, ते तुम्ही आम्हाला काढून द्या,” असे सांगितले. या संपूर्ण व्यवहारादरम्यान त्या व्यक्तीने कोणतेही ओळखपत्र, अधिकृत मंजुरीपत्र, बिल किंवा पावती दिली नाही.

काही दिवसांनी महिलेच्या बँक खात्यात १७ हजार रुपये जमा झाले. ही बाब समजताच तो भामटा पुन्हा महिलेच्या घरी धडकला आणि वारंवार होणाऱ्या मागणीला व दबावाला कंटाळून महिलेने त्यातील १२ हजार रुपये काढून त्या व्यक्तीच्या स्वाधीन केले. पैसे घेतल्यावर, “आमचा माणूस येऊन घरघंटी बसवेल आणि सर्व तांत्रिक माहिती देईल,” असे सांगून तो व्यक्ती तिथून निघून गेला. मात्र, पैसे देऊन तीन महिने उलटले तरी संबंधित व्यक्ती पुन्हा फिरकली नाही आणि घरघंटी बसवण्यासाठीही कोणी आले नाही. आता घरघंटी घरात पडून असून, तिची दुरुस्ती, वॉरंटी आणि नेमका हा व्यवहार कशाचा होता, असे अनेक प्रश्न त्या महिलेसमोर उभे राहिले आहेत. या फसवणुकीमुळे महिलेच्या घरातील वातावरण तणावपूर्ण झाले असून कुटुंबात वाद सुरू आहेत.

Total Visitors :
4820459
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *