हातखंबा येथे कुत्रा आडवा आल्याने रिक्षा पलटी; चालकासह तिघेजण जखमी

Gramin Varta
719 Views

रत्नागिरी /प्रतिनिधी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हातखंबा येथील आरटीओ कॅम्पसमोर मंगळवारी सकाळी घडलेल्या अपघातात रिक्षा पलटी होऊन चालकासह तीन जण किरकोळ जखमी झाले. अचानक कुत्रा रस्त्यावर आल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एमएच-०८-बीसी-१४८९ क्रमांकाची रिक्षा अनुस्कुरा (राजापूर) येथून रत्नागिरीच्या दिशेने येत होती. सकाळी सुमारे ७.१५ वाजण्याच्या सुमारास हातखंबा गावाजवळील आरटीओ कॅम्पसमोर अचानक एक कुत्रा रस्त्यावर आल्याने चालकाने रिक्षा वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाहनावरील नियंत्रण सुटून रिक्षा रस्त्याच्या डाव्या बाजूला पलटी झाली. या अपघातात चालक सफोन शकीब कॅप्टन यांच्यासह अफ्रिन तोडगी आणि निलोफर गुहागरकर हे किरकोळ जखमी झाले. जखमींना श्री नरेंद्र महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेद्वारे तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

अपघातानंतर रिक्षा रस्त्याच्या बाजूला हलविण्यात आल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू राहिली. घटनेची माहिती मिळताच हातखंबा टॅबचे अंमलदार तसेच रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी पुढील तपास आणि आवश्यक कार्यवाही रत्नागिरी ग्रामीण पोलीस करत आहेत.

Total Visitors :
4595340
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *