नसरापूरची जखम अजून ताजी असतानाच काळजाचा थरकाप उडवणारी घटना; १० वर्षीय चिमुकलीवर अत्याचारानंतर निर्घृण हत्या

Gramin Varta
299 Views

जुन्नर : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील तीन वर्षीय चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्येची घटना ताजी असतानाच जुन्नर तालुक्यातून माणुसकीला काळिमा फासणारी आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपळवंडी येथे घराशेजारी राहणाऱ्या २५ वर्षीय तरुणाने ओळखीचा फायदा घेत १० वर्षीय अल्पवयीन मुलीला शेतात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिची निर्घृण हत्या केल्याचा प्राथमिक तपासात संशय आहे. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

पिंपळवंडी येथील ही चिमुकली मंगळवारी दुपारपासून बेपत्ता होती. कुटुंबीयांनी तिचा शोध घेतल्यानंतर आळेफाटा पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी गावातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. दरम्यान, रात्री साडेनऊच्या सुमारास लेंडेस्थळ परिसरात ओढ्याच्या कडेला एका झाडाजवळ मुलीचा मृतदेह आढळून आला.

मुलीचा शोध घेत असताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एका २५ वर्षीय तरुणावर संशय घेतला. विशेष म्हणजे, संशयित तरुण स्वतः ग्रामस्थांमध्ये मिसळून पोलिसांसोबत मुलीचा शोध घेण्यात आणि सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात सहभागी होत होता. मात्र, तपासाची दिशा पुढे जात असताना पोलिसांचा संशय त्याच्यावर बळावला आणि त्याला ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, संशयित आरोपी हा पीडित मुलीच्या घराशेजारीच राहत होता. ओळखीचा फायदा घेत त्याने मुलीला घरातून शेताच्या दिशेने नेल्याचा संशय आहे. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

- Advertisement -

घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी रात्री उशिरा घटनास्थळी भेट देऊन तपासाचा आढावा घेतला. मोठ्या संख्येने ग्रामस्थ घटनास्थळी जमले होते. पोलीस अधीक्षकांनी ग्रामस्थांशी संवाद साधून परिस्थितीची माहिती घेतली. दरम्यान, फॉरेन्सिक लॅबचे पथकही घटनास्थळी दाखल झाले असून, घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे संकलित करण्याचे काम सुरू आहे.

नसरापूरच्या घटनेनंतर अवघ्या काही दिवसांतच पिंपळवंडी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या झाल्याची घटना समोर आल्याने पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. चिमुकलीच्या हत्येमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांकडून संशयित आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. या प्रकरणातील नेमके सत्य पोलिसांच्या पुढील तपासातून स्पष्ट होणार आहे.

Total Visitors :
4723678
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *