सायबर फसवणुकीत गेलेले पैसे आता परत मिळणार; ‘या’ पोर्टलवर करा अर्ज, ३० दिवसांत होणार निर्णय

Gramin Varta
345 Views

दिल्ली: सायबर फसवणुकीचे बळी ठरलेल्या नागरिकांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. सायबर गुन्हेगारांनी लंपास केलेली आणि बँकेने ‘होल्ड’ केलेली रक्कम आता परत मिळविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने यासाठी ‘एमआरएम’ (Money Recovery Module) तयार केले असून, तक्रारदाराला ऑनलाइन अर्ज करून आपल्या खात्यातील रोखून ठेवलेली रक्कम परत मागता येणार आहे. संबंधित प्रक्रियेनुसार बँकेला ३० दिवसांच्या आत निर्णय घेणे अपेक्षित आहे.

फसवणूक झाल्यानंतर नागरिकांनी सर्वप्रथम १९३० या सायबर हेल्पलाइन क्रमांकावर तातडीने तक्रार नोंदवणे आवश्यक आहे. तक्रार नोंदवल्यानंतर मिळालेला १४ अंकी क्रमांकही महत्त्वाचा ठरणार आहे. तक्रारीच्या आधारे सायबर गुन्ह्यातील रक्कम ज्या खात्यात अडकवून ठेवण्यात आली आहे, ती ‘होल्ड’ केली जाऊ शकते.

होल्ड केलेली रक्कम परत मिळविण्यासाठी तक्रारदाराने https://mrm-ncrp.mha.gov.in या पोर्टलवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा. पोर्टलवर मोबाईल क्रमांक टाकून ओटीपीद्वारे प्रक्रिया सुरू करता येते. त्यानंतर तक्रारदाराला आपले पॅनकार्ड, बँक खाते क्रमांक आणि IFSC कोड यांसारखी माहिती भरून अर्ज सादर करावा लागतो. अर्ज सादर केल्यानंतर एक युनिक रिक्वेस्ट क्रमांक मिळतो. या क्रमांकाच्या माध्यमातून अर्जाचा स्टेटस पाहता येतो.

५० हजारांपर्यंतच्या रकमेसाठी FIRची आवश्यकता नाही

या प्रक्रियेत ५० हजार रुपयांपेक्षा कमी रकमेच्या प्रकरणात FIR दाखल करण्याची किंवा न्यायालयाच्या आदेशाची आवश्यकता नसल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, ५० हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम असल्यास न्यायालयाच्या आदेशाची प्रत आवश्यक ठरू शकते. त्यानुसार संबंधित बँकेमार्फत होल्ड केलेली रक्कम परत मिळविण्याची प्रक्रिया केली जाते.

तक्रारदाराला ५०० रुपयांचा बाँड पोलिसांकडे द्यावा लागतो. या बाँडच्या आधारे पोलीस BNS कलम १०६(३) नुसार संबंधित बँकेला पत्र पाठवू शकतात. त्यानंतर बँक आवश्यक पडताळणी करून संबंधित तक्रारदाराच्या खात्यात होल्ड केलेली रक्कम जमा करण्याची प्रक्रिया करते.

१९३० वर तातडीने तक्रार करणे महत्त्वाचे

सायबर फसवणूक झाल्यानंतर वेळ न दवडता १९३० वर तक्रार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तक्रार लवकर नोंदवल्यास फसवणुकीची रक्कम पुढील खात्यांमध्ये ट्रान्सफर होण्यापूर्वीच संबंधित व्यवहारावर ‘होल्ड’ लावण्याची शक्यता वाढते.

सायबर गुन्ह्याचा बळी ठरलेल्या नागरिकांनी तक्रार नोंदवल्यानंतर एमआरएम पोर्टलवर अर्ज करून होल्ड केलेली रक्कम परत मिळविण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. प्रक्रियेत अडचण आल्यास नागरिकांनी जवळच्या सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून आवश्यक माहिती व मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

लक्षात ठेवा : सायबर फसवणूक झाली तर ‘नंतर पाहू’ असे न करता तातडीने १९३० वर तक्रार करा. वेळेत केलेली तक्रारच अडकलेली रक्कम वाचविण्यासाठी महत्त्वाची ठरू शकते.

Total Visitors :
4729937
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *