जंतरमंतर लाठीचार्ज प्रकरणी सुप्रीम कोर्टाने नेमली उच्चस्तरीय समिती

Gramin Varta
67 Views

आंदोलकांवरील कथित अतिबळाच्या आरोपांची करणार चौकशी

नवी दिल्ली: दिल्लीच्या जंतरमंतर येथे 30 जुलै रोजीच्या मोर्चावरील लाठीचार्जच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने उच्चस्तरीय समिती नेमली आहे.आंदोलकांवर कथितरित्या अत्याधीक बळाचा वापर करण्यात आल्याच्या आरोपांचा ही समिती तपास करणार आहे.

या समितीचे अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आर. सुभाष रेड्डी आहेत. समितीमध्ये पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश रवि शंकर झा, दिल्ली उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती शालिंदर कौर, सीबीआयचे माजी संचालक ऋषी कुमार शुक्ला तसेच मेघालयचे निवृत्त पोलीस महासंचालक डॉ. एल. आर. बिश्नोई यांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेली ही समिती आंदोलकांवर करण्यात आलेल्या कारवाईशी संबंधित विविध आरोपांची चौकशी करणार आहे. यामध्ये पॅलेट गन, इलेक्ट्रिक बॅटन, लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्यांचा कथित अतिवापर, महिला आंदोलकांवरील कथित हिंसाचार, पोलिसांकडून करण्यात आलेली निगराणी तसेच गर्दी नियंत्रणासाठी वापरण्यात आलेल्या पद्धती योग्य होत्या की नाहीत, याचा तपास करणार आहे.

याशिवाय, या घटनांमध्ये जखमी झालेल्या व्यक्तींना वेळेवर वैद्यकीय मदत आणि योग्य नुकसानभरपाई देण्यात आली की नाही, याचीही समिती चौकशी करणार आहे.

दरम्यान, पोलीस कर्मचाऱ्यांविरोधातील हिंसाचार तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याबाबत अधिकाऱ्यांनी केलेल्या आरोपांचीही ही समिती तपासणी करणार आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणातील आंदोलक तसेच सुरक्षा यंत्रणांकडून करण्यात आलेल्या कारवाईशी संबंधित आरोपांची वस्तुनिष्ठपणे चौकशी होण्याची शक्यता आहे.

Total Visitors :
4740466
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *