देवगड : देवगड बंदरातील ‘एकदंत’ या नौकेवरून बेपत्ता झालेल्या रत्नागिरी तालुक्यातील वासुदेव गणपत कांबळे (५८, मूळ रा. डोर्ले, गावखडी, रत्नागिरी; सध्या रा. देवगड बंदर) या खलाशाचा मृतदेह बंदर परिसरातील खाडीच्या पाण्यात आढळून आला. या घटनेमुळे बंदर परिसरात खळबळ उडाली असून, देवगड पोलीस स्थानकात या प्रकरणाची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलास नारायण खांदारे यांच्या मालकीच्या ‘एकदंत’ या नौकेवर वासुदेव कांबळे हे दशरथ बोराटे यांच्यासोबत खलाशी म्हणून काम करीत होते. शुक्रवारी रात्री सर्वजण नौकेवर झोपले होते. मात्र, शनिवारी पहाटेच्या सुमारास वासुदेव कांबळे हे नौकेवर दिसून आले नाहीत. त्यांचा नौका तसेच परिसरात शोध घेण्यात आला; मात्र ते आढळून न आल्याने दशरथ अशोक बोराटे (३८, मूळ रा. गावखडी, रत्नागिरी; सध्या रा. देवगड बंदर) यांनी देवगड पोलीस स्थानकात ते बेपत्ता असल्याची फिर्याद दिली होती.
दरम्यान, शोधमोहीम सुरू असतानाच वासुदेव कांबळे यांचा मृतदेह देवगड बंदर परिसरातील खाडीच्या पाण्यात आढळून आला. कांबळे हे गेल्या अनेक वर्षांपासून ‘एकदंत’ नौकेवर खलाशी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, देवगड पोलीस याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.
रत्नागिरीतील बेपत्ता खलाशाचा मृतदेह देवगड बंदर परिसरातील खाडीत आढळला
Leave a Comment




