रत्नागिरी : उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या हद्दपार आदेशाचे उल्लंघन करून रत्नागिरी शहरात प्रवेश केल्याप्रकरणी ४० वर्षीय व्यक्तीविरुद्ध रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात महाराष्ट्र पोलिस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमीर नजीर मजवार (वय ४०, रा. राजीवडा नाका, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमीर मजवार याला रत्नागिरीचे उपविभागीय दंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ मधील कलम ५६ (१) (अ) अन्वये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि रायगड या चार जिल्ह्यांतून दोन वर्षांच्या कालावधीसाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले होते. संबंधित हद्दपार आदेश दिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी प्राप्त झाल्यानंतरही त्याने आदेशाचे पालन केले नाही.
दरम्यान, २४ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे ८.१० वाजण्याच्या सुमारास डॉ. भोळे हॉस्पिटलसमोरील आठवडा बाजार परिसरात रस्त्यावर अमीर मजवार आढळून आला. हद्दपार आदेश लागू असतानाही तो प्रतिबंधित हद्दीत आढळून आल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस हवालदार दिपराज प्रकाश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ मधील कलम १४१ व १४२ अन्वये कारवाई करण्यात आली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
तडीपार आदेश झुगारून रत्नागिरीत वावरणाऱ्या तरुणावर गुन्हा
Leave a Comment







