आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लांजा येथे प्रशासनाची संयुक्त पाहणी

Gramin Varta
6 Views

लांजा/अरबाज नेवरेकर:- आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने चाकरमानी लांजा येथे येत असल्याने उत्सव काळातील विविध व्यवस्थांचे नियोजन करण्यासाठी नगरपंचायत प्रशासन, पोलीस प्रशासन, आरटीओ, हॉकर्स संघटना, रिक्षा-टेम्पो संघटना तसेच महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी लांजा शहरात संयुक्त पाहणी केली.

गणेशोत्सव काळातील गर्दी, हॉकर्सची व्यवस्था, रिक्षा व टेम्पोचे नियोजन, काळी-पिवळी टॅक्सी, पार्किंग तसेच महामार्गालगतच्या भागातील व्यवस्थेबाबत यावेळी पाहणी करून चर्चा करण्यात आली. चाकरमानी, स्थानिक नागरिक, व्यापारी तसेच व्यावसायिकांची गैरसोय होऊ नये आणि उत्सव काळात शहरातील विविध व्यवस्था सुरळीत राहाव्यात, यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने नियोजन करण्यावर भर देण्यात आला.

यावेळी लांजा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिजीत कुंभार, पोलीस निरीक्षक निलकंठ बगळे, कर निरीक्षक गीतांजली नाईक, लिपिक संजय गुरव, पोलिस कॉन्स्टेबल नितेश राणे , हॉकर्स संघटनेचे अध्यक्ष महेश नारकर, रिक्षा संघटनेचे अध्यक्ष लहु कांबळे, टेम्पो संघटनेचे अध्यक्ष अमोल शेलार, काळी-पिवळी टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष किशोर यादव तसेच महामार्ग विभागाचे अधिकारी व संबंधित प्रतिनिधी उपस्थित होते.

गणेशोत्सव काळात लांजा शहरातील सर्व व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी नागरिक, व्यापारी, हॉकर्स तसेच रिक्षा, टेम्पो आणि टॅक्सी चालकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, अशी विनंती प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.

Total Visitors :
4802275
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *