नेपाळमधील महापुराचा कहर; मृतांचा आकडा १,३४४ वर, ५ हजारांहून अधिक बेपत्ता

Gramin Varta
135 Views

काठमांडु: नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे झालेल्या भीषण विध्वंसात मृतांचा आकडा वाढून १,३४४ वर पोहोचला आहे, तर ५ हजारांहून अधिक लोक अद्याप बेपत्ता आहेत. नेपाळ पोलीस आणि बचाव पथके प्रभावित भागांतून सातत्याने मृतदेह बाहेर काढत आहेत.

नेपाळ पोलिसांच्या माहितीनुसार, बचाव पथके सुमारे ५ हजार बेपत्ता लोकांचा शोध घेत आहेत. यामध्ये किमान ५८९ परदेशी नागरिकांचा समावेश आहे. दरम्यान, १३ हजार १०० हून अधिक लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.

२६ ऑगस्ट रोजी नेपाळ-तिबेट सीमेच्या जवळ बर्फ आणि दगड घसरल्याने अचानक आलेल्या पुरामुळे उत्तर आणि मध्य नेपाळमधील अनेक शहरे, गावांमध्ये मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला. हिमालयीन सीमावर्ती भागातून दक्षिणेकडे वाहणाऱ्या भोटेकोशी नदीला आलेल्या पुराचे पाणी खालच्या भागात पोहोचले. त्यामुळे घरे, वाहने, रस्ते आणि पूल वाहून गेले, तसेच जलविद्युत प्रकल्पांचेही मोठे नुकसान झाले.

पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, कास्की जिल्ह्यात बांधकाम सुरू असलेल्या २४ मेगावॅटच्या सुपर सेती जलविद्युत प्रकल्पाच्या प्रवेश रस्त्यावर भूस्खलन झाले होते. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या दोन कामगारांचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.चिनी माध्यमांच्या वृत्तानुसार, या आपत्तीमध्ये चीनच्या हद्दीत किमान २१ जणांचा मृत्यू झाला आहे, तर तिबेटमध्ये ५०० हून अधिक लोक अद्याप बेपत्ता आहेत.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नेपाळमध्ये आतापर्यंत सापडलेल्या मृतदेहांमध्ये ८५ मुलांचा समावेश आहे, तर ५०१ मृतदेहांचे काही अवयव गायब आहेत. एकट्या चितवन जिल्ह्यात ३६० मृतदेह सापडले असून, सर्व जिल्ह्यांच्या तुलनेत हा आकडा सर्वाधिक आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ओळख पटवल्यानंतर आतापर्यंत केवळ ९८ मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

ओळख पटत नसलेल्या मृतदेहांची संख्या वाढत असल्याने नेपाळमधील रुग्णालयांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. वैद्यकीय केंद्रांमध्ये बेपत्ता नातेवाईकांचे फोटो हातात घेऊन मोठ्या संख्येने नागरिक जमा होत आहेत. भिंतींवर लावण्यात आलेल्या मृत व्यक्तींच्या छायाचित्रांमधून आपल्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी नागरिक प्रयत्न करत आहेत.

Total Visitors :
4819441
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *