लांजात ट्रक अपघातात चालकाचा मृत्यू, गुन्हा दाखल

Gramin Varta
213 Views

लांजा : मुंबई-गोवा महामार्गावर आंजणारी पुलाजवळ भरधाव वेगातील १२ चाकी ट्रकचा भीषण अपघात होऊन चालकाचा मृत्यू झाल्याची घटना ४ सप्टेंबर रोजी रात्री घडली. या अपघातात ट्रकचा क्लिनर जखमी झाला असून ट्रक व त्यामधील मालाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात ट्रक चालकावर हायगयीने गाडी चालवून स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात ४ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे १०.४५ वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरील आंजणारी पुलाजवळ, ता. लांजा, जि. रत्नागिरी येथे घडला. शाम सिंग (वय अंदाजे ५८, रा. सुकरताल, सहारनपूर, उत्तर प्रदेश) हा आपल्या ताब्यातील १२ चाकी टाटा ट्रक क्रमांक एचआर ३८ एक्स ०९९३ मधून स्लायडिंग माल घेऊन मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात होता.

आंजणारी पुलाच्या अलीकडे रस्त्याचा उतार असतानाही रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून ट्रक भरधाव वेगाने चालविल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रकचा अपघात झाला. या अपघातात चालक शाम सिंग गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान अथवा अपघातातील गंभीर दुखापतीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिस नोंदीत नमूद आहे.

या दुर्घटनेत ट्रकचा क्लिनर संदिप कृष्णलाल कुमार (वय ४१, रा. बेहट, सहारनपूर, उत्तर प्रदेश) याच्या उजव्या पायाला दुखापत झाली आहे. तसेच ट्रक आणि त्यामधील मालाचे नुकसान झाले आहे.

या प्रकरणी संदिप कृष्णलाल कुमार यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलम 106(1), 281, 125(a), 125(b) तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 अन्वये लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा ५ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ३.४० वाजता दाखल करण्यात आला असून, या अपघाताचा पुढील तपास लांजा पोलीस करीत आहेत.

Total Visitors :
4819981
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *