आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयात ११वीच्या विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

Gramin Varta
51 Views

देवरुख : देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता ११वीच्या नवागत विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ अत्यंत उत्साही आणि मंगलमय वातावरणात पार पडला. महाविद्यालयाच्या प्रांगणात प्रवेश घेतलेल्या नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत औक्षण करून आणि फुलांची उधळण करत करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने झाली, तर विद्यार्थिनींनी सादर केलेल्या गणेशवंदना व स्वागतगीताने वातावरणात चैतन्य निर्माण केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक प्रा. लुंगसे यांनी केले, तर संस्थाध्यक्ष सदानंद भागवत यांनी विद्यार्थ्यांना संस्थेच्या गौरवशाली परंपरेची ओळख करून दिली. महाविद्यालयीन जीवनातील शिस्त, अभ्यासाचे नियोजन आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक असणाऱ्या परिश्रमांचे महत्त्व त्यांनी आपल्या मनोगतातून अधोरेखित केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील नृत्याविष्कार आणि देशभक्तीपर समूह नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. १२वी वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी कु. सिद्धी झोरे हिने महाविद्यालयीन अनुभवांचे कथन करून नवागत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच, आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. अध्यक्षीय समारोपात उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील विविध संधींचा लाभ घेऊन प्रगती साधण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सीमा शेट्ये यांनी केले, तर आभार प्रा. देवयानी जोशी यांनी मानले. या समारंभामुळे नवागत विद्यार्थ्यांमध्ये महाविद्यालयाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन आणि आत्मविश्वास निर्माण झाला असून, शिक्षकांचे मोलाचे सहकार्य या कार्यक्रमाच्या यशात महत्त्वाचे ठरले.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *